मिक्‍सरट्रकच्या धडकेत महिला ठार 

अनिल कांबळे
मंगळवार, 10 जुलै 2018

नागपूर : पतीसह दुचाकीने घरी जात असलेल्या महिलेला मिक्‍सरट्रक वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. हा अपघात आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास भांडे प्लॉट चौकात झाला. आशा मोतीराम रोकडे (वय 50, तुकडोजी चौक) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

नागपूर : पतीसह दुचाकीने घरी जात असलेल्या महिलेला मिक्‍सरट्रक वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. हा अपघात आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास भांडे प्लॉट चौकात झाला. आशा मोतीराम रोकडे (वय 50, तुकडोजी चौक) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा रोकडे या एका शाळेत शिक्षिका होत्या. आज मंगळवारी दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर पतीसह दुचाकीने घरी जात होत्या. नागपूर-उमरेड रोडवर भांडे प्लॉटसमोरील शितला माता मंदिराजवळून जात असताना पती मारोती यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मागे बसलेल्या आशा यांचा तोल गेला. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या, त्याच दरम्यान मागून भरधाव येत असलेल्या मिक्‍सर ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या. वाहन भरधाव असल्यामुळे त्यांच्या डोक्‍यावरून चाक गेल्याने रस्त्यावर रक्‍ताचा सडा सांडला.

आशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सक्‍करदरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीपान पवार हे पथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी ऍम्ब्युलन्सला बोलावून रस्त्यावरील छिन्नविछिन्न झालेला मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. या प्रकरणी मारोती रोकडे यांच्या तक्रारीवरून आरोपी वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. 

मिक्‍सर वाहनाची तोडफोड 
अपघात होताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मिक्‍सरची तोडफोड केली. वाहनाला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच सक्‍करदराचे ठाणेदार पवार पोहचले. त्यांनी नागरिकांची समजूत घालून लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

जीव वाचविण्यासाठी चालक फरार 
अपघातात आशा यांच्या डोक्‍याचा चेंदामेंदा झाल्याचे आरोपी चालकाच्या लक्षात आले. तो मदतीसाठी धावणार तोच काही युवक वाहनाच्या दिशेने धावताना दिसले. त्यामुळे चालक दिलीप पटले (रा. भंडारा) हा वाहन सोडून पळून गेला. तो थेट सक्‍करदरा पोलिस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी त्याला अटक केली. 

तासभर ट्रॅफिक जाम 
अपघात झाल्यानंतर लगेच गर्दी जमा झाली. आफरीन शेख नावाच्या विद्यार्थिनीने लगेच रुग्णवाहिका आणि पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून माहिती दिली. सक्‍करदरा पोलिस पोहचेपर्यंत रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. जवळपास तासानंतर वाहतूक सुरळित झाली. पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे. 

Web Title: women killed in road accident