Women’s Day 2019 : महिलांनो, कारणे सोडा गुणवत्ता सिद्ध करा

Shital-Ugale
Shital-Ugale

नागपूर - अधिकारी म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर तुम्ही केवळ अधिकारी असता. त्यात महिला अधिकारी अथवा पुरुष अधिकारी असा भेद नसतो. महिलांनी सतत कारणे देण्यापेक्षा आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली तर, निश्‍चितच मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात, असे मत नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले यांनी व्यक्त केले. जागतिक महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ‘सकाळ’शी दिलखुलास संवाद साधला. 
अहमदनगर येथील शीतल उगले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसऱ्या आणि देशात ३७ वा क्रमांक मिळवित उत्तीर्ण झाल्या आहेत.

यूपीएससीतील देदीप्यमान यशानंतर त्यांनी रायगडला जिल्हाधिकारी, जळगावला जिल्हा परिषद सीईओ, पुणे येथे अतिरिक्त आयुक्त यांसारखी मोठमोठी पदे भूषविली आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदासह, सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. 

नासुप्रच्या सभापतिपदाचा पदभार स्वीकारणाऱ्या शीतल उगले-तेली यापूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होत्या. तेथे त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदा प्रक्रियेतील गोंधळाला चाप लावला होता. शिस्तप्रिय व वेळेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. 

रायगड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना, सावित्री नदीचा पूल कोसळला होता. त्या घटनेत ४० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्येक जण प्रशासनाला धारेवर धरत होते. उगले यांनी नागरिकांचा उद्रेक, मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करून प्रशासकीय मदत मिळवून दिली. सोबतच अतिशय संवेदनशील प्रकरण अत्यंत संयमाने सांभाळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. 

‘सुपर वुमन’चा अट्टहास नको 
महिलांनी उगाचच महिला असल्याचे भांडवल करू नये. स्वतः सर्व कामांची जबाबदारी अंगावर घ्यावी. मात्र, उगाच सुपर वुमन होण्याचा अट्टहास न करता, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कामाची जबाबदारी वाटून द्यावी. त्यामुळे घरात सपोर्ट सिस्टीम उभी राहते आणि त्यामुळेच महिला स्वावलंबी होते. मी आणि माझे पती आम्ही दोघंही प्रशासकीय सेवेत असल्याने, अनेकवेळा भेट होत नाही. माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाला घरी माझे आई, वडील आणि आजी सांभाळत असल्याने, मी त्याबाबत निर्धास्त असल्याचे उगले यांनी सांगितले. 

गरजा ओळखून अभ्यास करा 
सध्या स्पर्धा परीक्षांकडे वळलेल्या तरुणांची संख्या मोठी असली तरी, निकालाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्यास तुम्ही परीक्षेचा फॉर्मेटच समजून नाही घेतला असे वाटत. अभ्यास करताना पुस्तकांच्या प्रेमात पडण्यात अर्थ नाही. पेपरमध्ये कोणत्या  टॉपिकवर प्रश्‍न विचारले आहेत ते बघून तेवढचं वाचन केल्यास चांगले. वाचनाच्या बाबतीतही इनपुट आणि आऊटपुट रेशोचा विचार करण गरजेचे आहे. परीक्षेबाबत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com