तिच्या हाती बैलाची दोरी... (व्हिडिओ)

राम चौधरी
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

महिलांचा सन्मान
ढोरखेड्यात पुरूषांनीच बैलांना तोरणाखाली नेण्याची परंपरा आहे. शेतीत राबताना महिला पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात. त्यांनाही पोळ्याचा मान मिळावा, यासाठी गावात चर्चा केली. गावकऱ्यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे गावातील महिलांनी बैलाचे कासरे धरून पोळा साजरा केला. 
 - सुनीता मिटकारी, सरपंच, ढोरखेडा
 

वाशिम : सणवार असो की, कोणताही उत्सव... घरातील महिलेला रांधा, वाढा आणि उष्टी काढा हेच काम असते. विशेषत: बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना गावात मिरवण्याचे आणि त्यांच्यासोबत स्वत: मिरवण्याचे काम पुरुषांचे. मग महिला बैलांचे चारापाणी, वैरण, सांभाळ करत असल्या तरी मिरवायचा मान पुरुषांचा. पण, यवतमाळमधील ढोरखेडा गावात बैलपोळ्याच्या दिवशी मिरवणुकीत बैलांची दोरी त्यांचा सांभाळ करणाऱ्या महिलांच्या हातात देण्यात आली. यानिमित्ताने महिलांचा सन्मान करून या गावाने एक आदर्श घालून दिला आहे.

कृषिसंस्कृतीचा सोहळा असलेल्या पोळ्यात तोरणाखाली बैलांचा कासरा धरण्याचा मान या गावात गेली पाच वर्षे महिलांना मिळत आहे. महिला सरपंच सुनीता मिटकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

कृषी संस्कृतीचा आनंदसोहळा म्हणजेच पोळा. बळीराजाच्या साथीने घामाचा वाटेकरी होणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. हा सण गावखेड्यात उत्साहाने साजरा केला जातो. मात्र या सणाला मानाचे पान पुरुषासाठी राखीव असते. असे म्हणतात, शेतीचा शोध महिलांनी लावला मात्र, या सणाला महिलांना कोणताही मान मिळत नाही. मात्र मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा गावाने कृषीसंस्कृतीच्या निर्मिकेला तोरणाखाली बैलाचा कासरा धरण्याचा मान बहाल केला.

गावाजवळील पारासमोर पुरूषांच्या हाती बैलजोडीचा कासरा ही परंपरा मोडीत काढून ढोरखेडा गावात महिलांनी बैलांना तोरणाखाली आणले आणि ढोरखेड्याने खऱ्या अर्थाने मातृसत्तेचा गौरव केला.

महिलांचा सन्मान
ढोरखेड्यात पुरूषांनीच बैलांना तोरणाखाली नेण्याची परंपरा आहे. शेतीत राबताना महिला पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात. त्यांनाही पोळ्याचा मान मिळावा, यासाठी गावात चर्चा केली. गावकऱ्यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे गावातील महिलांनी बैलाचे कासरे धरून पोळा साजरा केला. 
 - सुनीता मिटकारी, सरपंच, ढोरखेडा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens honerd Occasion of Bailpola