"मांजरसेनेने' पळवून लावले होते इंग्रज अधिकारी

"मांजरसेनेने' पळवून लावले होते इंग्रज अधिकारी
नागपूर : भारताच्या स्वातंत्र्यकुंडात असंख्य महिलांनी प्राणाहुती दिली. केवळ चूल व मूल एवढेच मर्यादित न राहता महिलांनी थेट क्रांतिकारी चळवळीत सहभाग नोंदवला. नागपुरातील महिलांनी प्रारंभ केलेल्या मांजरसेनेने इंग्रज अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. या सेनेतील सदस्य "म्याव म्याव...' या सांकेतिक भाषेत एकमेकींशी बोलत असत.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महिलांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावी अशीच आहे. याच काळात गुप्त कारवायांसाठी वानरसेना कार्यरत असत. मात्र, त्यात महिलांचा सहभाग नसायचा. याच धर्तीवर प्रमिला वऱ्हाडपांडे यांच्या नेतृत्वात मांजरसेना ही महिलांची शाखा नागपुरात प्रारंभ झाली. भूमिगत क्रांतिकारकांसाठी स्वयंपाक करणे, त्यांना गुप्त निरोप पोहोचविणे, पत्रके वाटण्यात मांजरसेनेतील महिलांचा मोलाचा वाटा होता. महत्त्वाचे म्हणजे त्याकाळात मुलींवर संशय घेतल्या जात नसल्याने सर्वच कामे यशस्वी होत असे. नागपूर त्रिशताब्दी महोत्सवाच्यावेळी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात मांजरसेनेचा संदर्भ आढळतो.
शहरातील महिलांनी सविनय कायदेभंग लढ्यात मिठाचा सत्याग्रह, शस्त्र सत्याग्रहात, खादी प्रचारासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रभातफेरी काढून राष्ट्रीय गीत, स्वरचित गीते व पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. धंतोली, हंसापुरी, इतवारी आणि सदर भागात राहणाऱ्या सुमारे 64 ते 70 महिलांना विविध कारवायांमुळे तुरुंगवास भोगावा लागला आहे. काही महिलांना तर एक वर्षांचा व 500 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागला. या घटनेची नोंद "नागपूर प्रांताचा इतिहास' या मा. ज. कानिटकरांच्या पुस्तकात आहे.
1935 च्या सुमारास अनसूयाबाई काळे नगर कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. 1935 साली महात्मा गांधी नागपुरात आले असताना त्याच्या हस्ते इतवारी व सीताबर्डी भागात खादी भंडार स्थापन झाले. या काळात नागपूर लढ्यातील केंद्रबिंदू झाले. या काळात अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वात अनसूयाबाई काळे सभा, ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करत. या कार्यक्रमांमध्ये सुभगाबाई काशीकर, कुलसुंबी याकूब व कमलाबाई होस्पेट यांच्या नेतृत्वात रमा तांबे, लीला ढवळे, विमला अभ्यंकर, प्रमिला वैद्य, निर्मला बेहरे, चंद्रभागा पटवर्धन, बकुळा अभ्यंकर, जिजी बन्सोड व इंदिरा रूईकर यासारख्या असंख्य महिलांनी योगदान दिले आहे.
1920 साली झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाला 169 महिला उपस्थित होत्या. यावेळी चिटणीस, बुटी आणि किनखेडे घराण्यातील महिलांनी अंगावर असलेले दागिने टिळक राष्ट्रीय फंडाच्या झोळीत टाकले. या दागिन्यांच्या लिलावातून मोठे आर्थिक साहाय्य राष्ट्रीय कॉंग्रेसला मिळाले होते. 1925 साली प्रसिद्ध झालेल्या "इंडिपेंडंट' वृत्तपत्रात महात्मा गांधी यांच्या लेखात हा संदर्भ आढळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com