आश्‍चर्यच..! क्रिकेट चेंडूएवढा "किडनी स्टोन'

सतीश तुळसकर : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

उमरेड : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांच्या चमूसोबत डॉ. जगदीश तलमले.

उमरेड : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांच्या चमूसोबत डॉ. जगदीश तलमले.

उमरेड : तालुक्‍यातील एका 42 वर्षांच्या युवकाला मुतखड्याचा (किडनी स्टोन) अतिशय त्रास झाला. त्याने उमरेडच्या आर्च एंजल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून घेतली. त्याच्या पोटातून क्रिकेट चेंडूच्या आकाराचा अर्धा किलो वजनाचा दगडाचा गोळा काढण्यात शनिवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. सध्या रुग्णाची प्रकृती बरी असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.
तालुक्‍यातील पेंढारबोडीतील युवक सुनील (बदललेले नाव) यांना अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. सोनोग्राफी केल्यानंतर पोटात (मूत्राशयात) मुतखडा असल्याचे समजले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधे घेतली. परंतु, त्यांना आराम मिळाला नाही. मुतखड्याचा आकार दिवसेंदिवस वाढतच गेला. अशातच त्यांना शस्त्रक्रियेच्या काही दिवसांआधी तीव्र पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी त्यांच्या परिवारातील व मित्रपरिवारातील मंडळींनी धावाधाव करून आर्च एंजल हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्या रुग्णास दाखल केले. हॉस्पिटलचे संचालक डॉक्‍टर जगदीश तलमले यांनी नागपूरच्या काही किडनी रोगतज्ज्ञ डॉक्‍टरांना आमंत्रित केले. त्यांच्याकडून शस्त्रक्रिया करून रुग्णांच्या पोटातील अर्धा किलो वजनाचा दगड काढला. याची लांबी-रुंदी जवळपास 11 सेंटीमीटर आहे. यासाठी तीन तासांची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर डॉक्‍टरांना दगड काढणे शक्‍य झाले. शस्त्रक्रियेसाठी डॉक्‍टर जयंत निकोसे, डॉ. जयस्वाल, डॉ. रोशनी सोनकुसरे, डॉ. चंद्रशेखर नरुले, डॉ. सुशील शाहू यांनी मदत केली.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय सुरू केले. नागपुरातील डॉक्‍टरांना उमरेड येथे आमंत्रित करून ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. उमरेडसारख्या ग्रामीण भागात ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्यामुळे समाधान वाटते.
-डॉ. जगदीश तलमले, संचालक, आर्च एंजल हॉस्पिटल, उमरेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wonderful ..! "Kidney Stone" as much as Cricket Ball