esakal | डफरीन रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला 'ब्रेक', निधीचा अभाव : 200 बेडच्या सुसज्ज इस्पितळाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

vidrbha

डफरीन रुग्णालयाची सध्याची स्थिती पाहता त्याचा विस्तार तातडीने करणे आवश्‍यक आहे. मात्र 45 पैकी केवळ 15 कोटी रुपयांचाच निधी शासनाकडून आल्याने बांधकाम रखडले आहे.

डफरीन रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला 'ब्रेक', निधीचा अभाव : 200 बेडच्या सुसज्ज इस्पितळाची प्रतीक्षा

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारासाठी सुरू करण्यात आलेले काम निधीअभावी रखडल्याने सध्याच्या आरोग्याच्या सक्षम सोयींच्या आवश्‍यकतेच्या काळात यंत्रणेलासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. निधीच नसल्याने मार्च महिन्यापासून कामांना ब्रेक लागला आहे. सुमारे 45 कोटी रुपयांच्या 200 खाटांच्या रुग्णालय विस्तारीकरणाच्या या कामाला 2013 मध्ये मंजुरी मिळाली होती व 2018 मध्ये वर्कऑर्डर काढण्यात आली. डफरीन रुग्णालयाची सध्याची स्थिती पाहता त्याचा विस्तार तातडीने करणे आवश्‍यक आहे. मात्र 45 पैकी केवळ 15 कोटी रुपयांचाच निधी शासनाकडून आल्याने बांधकाम रखडले आहे.

विशेष म्हणजे, इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर विद्युतीकरण व अन्य कामे होणार आहेत. त्यामुळे या कामाला आणखी किती कालावधी लागणार असा प्रश्‍न करण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून अतिशय संथगतीने काम सुरू असल्याची माहिती आहे. इमारतीचे बांधकाम (सिव्हिल वर्क) पूर्ण झाले नसल्याने त्यानंतर होणाऱ्या विद्युतीकरण व अन्य कामांना कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्‍न करण्यात येत आहे. मार्च महिन्यात काही निधी मिळाला होता, परंतु हा तोकडा निधीसुद्धा अपुरा ठरला आहे. यासोबतच गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम बांधकामावर झाल्याचे सांगण्यात येते.

डफरीनची ही नवी इमारत अतिशय भव्य राहणार असून तळमजल्यासह चार मजल्यांमध्ये विविध विभागांचा समावेश राहणार आहे. आयसीयू, आपत्कालीन कक्ष, हायरिस्क वॉर्ड, लेबर वॉर्ड, सहा ऑपरेशन थेटर, रेडिओलॉजी, ब्लडबॅंक, फॅमेली प्लॅनिंग डे केअर, हिरकणी कक्ष, डॉक्‍टरांच्या राहण्याची व्यवस्था, कॉन्फरन्स, सेमिनार, लेक्‍चर व मिटिंग हॉल अशा सर्वच सोयी याठिकाणी राहणार आहेत.

कामाला लवकरच गती येईल... 

डफरीन रुग्णालयाच्या विस्तारित 200 बेडचे रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या स्थितीमुळे थोडे डायव्हर्शन झाले आहे. औषधी व अन्य कामांसाठी जास्त निधी लागला. मात्र, डफरीनचे हे रुग्णालय निश्‍चितच पूर्ण होईल, या कामाला लवकरच गती येईल, असे राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी... 

मार्च महिन्यात रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली होती. सध्या निधीचा अभाव असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे, असे शहराच्या आमदार सुलभा खोडके यांनी सांगितले.

मुदतवाढ मागितली... 

45 कोटी रुपयांच्या या रुग्णालयासाठी आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा निधी आला आहे. जानेवारी 2020 पर्यंत कामाची मुदत होती. आता आम्ही जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ मागितली आहे, असे या प्रकल्पाची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top