निवडणुकीच्या तोंडावर रस्ते अर्ध्यावर!

सागर कुटे
शुक्रवार, 8 मार्च 2019

अकोला : रस्ते चकाचक तर मताधिक्य भरमसाठ या वृत्तीने चालत असलेल्या ‘रोडकरीं’च्या विकास मार्गाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असून, रस्त्यांचा विकास अर्ध्यावरच आहे. युती सरकार येताच अकोला आणि बुलडाणा दोन जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चाैपदरीकरणाचे काम धुमधडाक्यात सुरू करण्यात आले. मात्र, ते आता थंडबस्तात पडल्याने प्रवाश्यांची डोकेदुखी वाढली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडचणीचा मार्ग लांबतच आहे. विविध कारणामुळे 2013 पासून अमरावती ते नवापूरपर्यंतचा 480.79 कि. मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रकल्पाला मंजुरी देऊन एल अ‍ॅण्ड टी कंपनीला काम दिले होते. भूसंपादनातील दिरंगाईसह विविध अडचणींमुळे काम सुरू होण्यापूर्वीच एल अ‍ॅण्ड टी कंपनीने काम सोडले. सत्ता पालट होताच युती सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात या महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती मिळाली.

गडकरींनी 31 ऑक्टोबर 2015 ला अकोल्यात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. भूमिपूजन अटोपताच रस्त्याचे काम सुपरफास्ट गतीने सुरू झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गाच्या ‘इन प्राेग्रेस’ कामाचा प्रभाव येथील प्रवाशांवर दिसून येत होता. जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अपघाताची संख्या वाढली. या महामार्गाचे काम जुलै 2018 पासून ठप्प पडले आहे.

तीन वर्षांत झाले नाही; तीन महिन्यात काय होणार?
अकोला व बुलडाणा जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या महामार्गाचे काम तीन वर्षात 22 टक्क्यांवर आले असून, मे 2019 पर्यंत मुदत असल्याने उर्वरित तीन महिन्यात या मार्गाचे काम शक्य नाही. तीन वर्षांत काहीही झाले नसताना आता तीन महिन्यात काय होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work of road is incomplete at akola