गावासाठी त्याने मुलीचे ऑपरेशन ढकलले पुढे!

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 2 मे 2018

संग्रामपूर (बुलडाणा) : पोटच्या मुलीचे ऑपरेशन लांबणीवर ठेऊन तो गावाच्या पाणी समस्येसाठी श्रमदान करण्यासाठी गावात परत आला. ऑपरेशन तर करता येईल, पण गावात सुरू झालेली श्रमदानाच्या चळवळची वेळ निघून गेली तर मोठे नुकसान होऊ शकते. असे ध्येय ठेऊन  पाणी फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेले तालुक्यातील एकलारा बानोदा येथील शेत मजूर प्रमोद श्रीकृष्ण धुळे गावासाठी जलदुतच म्हणावे लागतील.

संग्रामपूर (बुलडाणा) : पोटच्या मुलीचे ऑपरेशन लांबणीवर ठेऊन तो गावाच्या पाणी समस्येसाठी श्रमदान करण्यासाठी गावात परत आला. ऑपरेशन तर करता येईल, पण गावात सुरू झालेली श्रमदानाच्या चळवळची वेळ निघून गेली तर मोठे नुकसान होऊ शकते. असे ध्येय ठेऊन  पाणी फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेले तालुक्यातील एकलारा बानोदा येथील शेत मजूर प्रमोद श्रीकृष्ण धुळे गावासाठी जलदुतच म्हणावे लागतील.

आदिवासी बहुल संग्रामपुर तालुका चळवळीच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर मानला जातो. जलक्रांती ही चळवळ या तालुक्यात 8 एप्रिल पासून सुरु झाली. एकलारा बानोदा गावामध्ये पाणी अडविण्यासाठी श्रमदानातून कामे करण्यासाठी गाव एका विचाराने एकत्रित बसले व गावातील घटलेली पाण्याची पातळीत वाढ करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेचे माध्यम गावहिताचे ठरू शकेल म्हणून गावातील काही जेष्ठ व सामाजिक कार्याची आवड असलेल्या सर्वांनी मोठे कार्य हाती घेतले. या गावातून पाणी फाऊंडेशनचे जलमित्र म्हणून प्रमोद धुळे प्रशिक्षण घेऊन आले.

8 एप्रिल पासून गावात कामाला सुरुवात होणार होती. त्या पूर्वी प्रमोद धुळे यांनी त्यांचे नऊ वर्षीय भाग्यश्री नामक मुलीचे मानेचे हाड तिरपे वाढत असल्याने तिची मान तिरपी होऊ लागली, म्हणून तिला दवाखान्यात नेले डॉक्टरांनी मानेचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारे प्रमोद धुळेंसाठी शासकीय हॉस्पिटल शिवाय पर्याय नव्हता. असे ऑपरेशन मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी होणे शक्य असल्याने त्यांनी पुणे येथील संतोष अस्वार यांच्या ओळखीने 26 मार्चला पुण्यातील कमान मिलटरी हॉस्पिटलमध्ये सर्व चेकअप करून घेतले. त्यामध्ये ऑपरेशनची तारीख 8 एप्रिल देण्यात आली.

इकडे गावात 8 एप्रिल पासून काम सुरू होणार, मी गावात नसलो तर कसे होणार याची खंत प्रमोदला कासावीस करीत होती. अखेर त्यांनी ऑपरेशन नंतर करू अगोदर गावासाठी काम करू असा निर्णय अस्वार यांना सांगितला. त्यावर अस्वार यांनी धुळे यांची बरीच समजूत काढली की, तुम्ही नसलात, तर काय होणार आहे, ऑपरेशनसाठी नंबर लागला पंधरा दिवस प्रतीक्षा केली अजून थाबुंन जा, मात्र गावाच्या तळमळीने प्रमोद धुळे यांनी मुलीचे ऑपरेशन लांबणीवर ठेऊन गावासाठी वेळ देण्यात स्वारस्य दाखवले. 8 एप्रिल पासून त्यांच्या समवेत अख्खे कुटुंब दररोज श्रमदान करीत आहेत. भलेही त्यांच्या कामातून फार मोठे पाणी आडविण्याचे कार्य होणार नाही .पण त्यांची गावाप्रति असलेली प्रेरणा इतरांसाठी खूप काही संदेश देणारी म्हणावी लागेल!

Web Title: for work in village he decide to do daughter s operation later