मजुरांना रेल्वेगाडीने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

टेकाडी (जि. नागपूर) : नागपूर-कोलकाता रेल्वेमार्गावर रुळांची दुरुस्ती करणाऱ्या दोन मजुरांना रेल्वेगाडीने चिरडल्याची घटना मौदा तालुक्‍यातील गांगणेर शिवारात गुरुवारी (ता. पाच) दुपारी घडली. रेल्वेगाडीचा वेग लक्षात न आल्याने दोघांच्याही शरीराचे तुकडे झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रवींद्र मांगोजी येळणे (वय 35, रा. तारसा) व शालीकराम वैजनाथ विश्वकर्मा (वय 41, रा. विरसी) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी मौदा तालुक्‍याती साळवानजीकच्या गांगणेर शिवारातील रेल्वेमार्गावर रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. कंत्राटदार सुरेंद्र शेंडे यांच्याकडे काम करणारे रवींद्र व शालिकराम हे दोघेही काम करीत असताना नागपूरकडे जाणाऱ्या पुरी-जोधपूर एक्‍स्प्रेसने दोघांनाही धडक दिल्यावर त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. घटनेनंतर कामावरील मजुरांनी रोष व्यक्त करीत काम बंद केले. आसपासचे नागरिकही गोळा झाले. कंत्राटदार सुरेंद्र शेंडेसह नागपूरहून वरिष्ठ सेक्‍शन इंजिनिअर पी. के. वर्मा हेदेखील घटनास्थळी पोहचले. जमावासह कुटुंबीयांनी नुकसानभरपाईची मागणी रेटून धरत मृतदेह उचलण्यास नकार दिला. यानंतर शुक्रवारपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे लिखित आश्‍वासन मिळाल्यावर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास कन्हान व रेल्वे पोलिस करीत आहेत. मृत रवींद्र व शालिकराम दोघेही हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मृत रवींद्रच्या मागे पत्नी, मुलगा आणि एक मुलगी व आई असा आप्तपरिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The workers were crushed by the train