महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर ः पोलिस आयुक्‍तालयाच्या वतीने महिलांच्या सुरक्षा आणि उपाय या संदर्भात जनजागृती करण्यासाठी 26 ते 30 ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय "जागरूक मी आणि समाज' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन पोलिस उपायुक्‍त विनीता साहू यांनी केले. यावेळी विशेष शाखेचे उपायुक्‍त निर्मला देवी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या श्‍वेता खेडकर उपस्थित होत्या.

नागपूर ः पोलिस आयुक्‍तालयाच्या वतीने महिलांच्या सुरक्षा आणि उपाय या संदर्भात जनजागृती करण्यासाठी 26 ते 30 ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय "जागरूक मी आणि समाज' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन पोलिस उपायुक्‍त विनीता साहू यांनी केले. यावेळी विशेष शाखेचे उपायुक्‍त निर्मला देवी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या श्‍वेता खेडकर उपस्थित होत्या.
पोलिस उपायुक्‍त निर्मला देवी म्हणाल्या, सध्या ऑनलाइन आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे. अनेकदा कळत-नकळत विद्यार्थिनी किंवा तरुणींकडून वेगवेगळ्या ऍप्सचा वापर केला जातो. ऍप्समध्ये स्वतःची माहिती आणि फोटो बिनधास्तपणे देण्यात येतात. तसेच फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि अन्य सोशल मीडियावरही फोटो आणि माहिती मुली शेअर करतात. तीच चूक त्यांना अनेकदा अडचणीत आणू शकते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे, काय करू नये, याचे प्रशिक्षण पोलिसांच्या कार्यशाळेत किंवा उपक्रमांअंतर्गत देण्यात येणार आहे. परिमंडळ-5 मध्ये येत्या 26 ऑगस्टला जरीपटक्‍यातील महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रमाचे 11 ते 1 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. तसेच 27 ऑगस्टला वर्धमाननगरातील व्हीएमव्ही महाविद्यालयात, 28 ऑगस्टला वायसीसी कॉलेज हिंगणा, 29 ऑगस्टला शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये तर 30 ऑगस्टला केडीके कॉलेज नंदनवन येथे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात दामिनी पथक, बडी कॉप, छात्रपोलिस आणि भरोसा सेलबाबत माहिती देण्यात येणार आहे. छेडखानी, विनयभंग, पाठलाग करणे किंवा अन्य गुन्ह्यांबाबत माहिती व मार्गदर्शन मुलींना करण्यात येणार आहे.

थेट उपायुक्‍तांकडे तक्रार करा
अजनी पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणीला पोलिस निरीक्षकांनी चक्‍क ठाण्यातून हाकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. असा प्रकार होत असल्यास मुलींनी तक्रार कोठे करावी? या प्रश्‍नावर बोलताना निर्मला देवी म्हणाल्या की, पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल न घेतली गेल्यास थेट पोलिस उपायुक्‍तांना भेटावे.
फ्रेंड्‌स प्रकरणाचा परिणाम
किसन अग्रवाल याच्या मालकीचे सीताबर्डीतील फ्रेंड्‌स दुकानात निखिल चौथमल या आरोपीने ट्रायल रूममध्ये छुप्या कॅमेऱ्याने विद्यार्थिनीचा अश्‍लील व्हिडिओ काढला होता. या प्रकरणानंतर शहरातील महिला व युवतींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. हे प्रकरण निस्तारण्यासाठी विद्यार्थिनींमध्ये जागृती करण्यासाठी तीन महिला पोलिस अधिकारी सरसावल्याची चर्चा पोलिस दलात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workshop for women's safety