अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याला भेगा, अपघात झाल्यास जबाबदार कोण?

worst construction of cement road in aheri of gadchiroli
worst construction of cement road in aheri of gadchiroli

अहेरी (गडचिरोली):  अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये मार्च 2020 दरम्यान खमनचेरू रोडला लागूनच सिमेंट रस्ता बनविण्यात आला. मात्र, अवघ्या सहा महिन्यात रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायतीवर रोष व्यक्त केला आहे.

अहेरी नगरपंचायत झाल्यापासून नगराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून प्राप्त होतात. जनतेला दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ठिकाणी सिमेंटचे पक्‍के रस्ते, बंदिस्त नाली कामे केली जातात. त्यानुसार अहेरीत विविध प्रभागांत कामे पूर्ण झाली आहेत. त्यामधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्नेहा लॉन्स समोरच्या बाजूला खमनचेरू रस्त्याला लागून असलेल्या भागात नुकतेच दोन रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. हे दोन्ही बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून यातील एक काम मार्च 2020 मध्ये पूर्ण झाले. या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यांत मधोमध तडा गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता असलेली जमीन काम सुरू करण्यापूर्वी सपाट करून रोडरोलरने दबाई न करताच तुरळकपणे दगड टाकून वाळू भरली. पाणीसुद्धा नीट टाकले नव्हते. घाईगडबडीत सिमेंट टाकून रस्ता तयार केला. परंतु, त्यावर आवश्‍यक तेवढे पाणी टाकण्यात आले नाही, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. अहेरी नगरपंचायतीने कोट्यवधींचा रस्ता व बंदिस्त नालीची कामे केली असून त्याचीसुद्धा चौकशी करण्याची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी नालीवर झाकण ठेवलेले नाही, जिथे आहे तिथेच त्या फुटलेल्या स्थितीत आहेत. इतरही अनेक बांधकाम निकृष्ट असल्याची ओरड होत आहे.

अपघाताला जबाबदार कोण?
या सिमेंटच्या रस्त्याला मधोमध मोठी भेग गेल्याने येथून जाणाऱ्या वाहनाचे संतुलन बिघडून अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. किंबहुना आतापर्यंत अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. पण, मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. अशावेळेस एखादा मोठा अपघात होऊन प्राणहानी झाल्यास याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com