वाह रे वनविभाग! वर्ष उलटले तरी दृष्टिहीन बहिणी-भाऊ मदतीच्या प्रतीक्षेतच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

वरोरा (जि. चंद्रपूर) : एका वर्षापूर्वी वरोरा तालुक्‍यातील अर्जुनी गावातील महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. तिच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आहे. दोघेही भावंडे दृष्टिहीन आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी वनविभागाकडे कागदपत्र सुपूर्द केले. मात्र वर्षाचा कालावधी उलटूनही वनविभागाने मदत दिली नाही. वनविभागाच्या बफर व कोअर झोनच्या वादात आर्थिक मदत अडकली असल्याचे समजते.

वरोरा (जि. चंद्रपूर) : अर्जुनी गावातील एका डोळ्याने अंध असलेल्या तुळसाबाई किसन केदार आपल्या हरिदास व संगीता या दोन दृष्टिहीन मुला-मुलीसोबत राहत होती. तुळसाबाईला पती नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारीच तिचीच आहे. घरी शेती नसल्याने व मूल अंध असल्याने स्वतः तुळसाबाई मोलमजुरी करून संसार चालवीत होती. अशातच तीन नोव्हेंबर 2018 या दिवशी अर्जुनी गावानजीक असलेल्या माणूसविंड येथे तुळसाबाई गेली. तिथे बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले.
तुळसाबाईच्या मृतदेहाच्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. सोपस्कार पूर्ण केल्यानंतर अर्जुनी ग्रामस्थांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मुलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी वनविभागाने मागितलेली कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. परंतु, एक वर्षाचा कालावधी लोटूनही त्या दृष्टिहीन बहीण-भावास आर्थिक मदत मिळाली नाही. अर्जुनीचा शेतशिवार बफरमध्ये तर त्यापुढे ताडोबा अभयारण्याचे कोअर झोन लागते.
तुळसाबाईवर कोअर झोनमध्ये बिबट्याने हल्ला केल्याचे वनविभाग पुराव्यासहित सिद्ध करीत असल्याने दोन्ही मुला-मुलीला आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले. तुळसाबाईच्या मृत्यूनंतर याच परिसरात बिबट्याने चारपेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेतला. त्या सर्व घटना बफर झोनमध्ये घडल्या आहेत. त्यांच्या वारसांना वनविभागाने मदत दिली आहे. मात्र तुळसाबाईचे दृष्टिहीन मुले याला अपवाद ठरली. घटनास्थळ ताडोबाच्या कोअर झोनमध्ये येते. मदतीचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी दिली.
भाऊ-बहिणीला आनंदवनाचे छत्र
महारोगी सेवा समितीने सचिव डॉ. विकास आमटे व आनंदवनचे प्रभारी सरपंच तसेच महारोगी सेवा समितीचे विश्‍वस्त सुधाकर कडू यांना मृत तुळसाबाईच्या मागे हरिदास व संगीता हे दोन्ही अंध मुले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दोघांनाही आनंदवनात घेऊन आले. सध्या ते आनंदवनातील हातमाग विभागात काम करतात. हरिदासची पत्नी दिव्यांग आहे. त्यांना एक मुलगी आहे. ती सुद्धा दृष्टिहीन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wow Ray Forest Department! As the years turn, the blind siblings await help