गडचिरोलीत धावतात भंगार बसगाड्या 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 December 2019

"प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्‍य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसगाड्या प्रवाशांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. अनेकदा या बसगाड्या तांत्रिक बिघाडामुळे बंद पडतात, तर कधी अपघातग्रस्त होतात. कित्येक बसगाड्यांमध्ये मोडक्‍या खुर्च्या आहेत, तर कुठे खुर्च्यांचाच पत्ता नाही. त्यामुळे या सरकारी वाहनातून प्रवास करायचा, तरी कसा, असा प्रश्‍न प्रवाशांसमोर उपस्थित होते आहे. 

गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण, या प्रवाशांच्या सोयीकडे महामंडळाने अजिबात लक्ष दिले नाही. अद्याप रस्त्यावर या महामंडळाच्या भंगार अवस्थेतील बसगाड्या धावताना दिसतात.

अनेकदा बसगाड्यांचे चालकही ही भंगार वाहने भरधाव चालवतात. अशाच एका बसगाडीची शुक्रवारी (ता. 13) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसली. यात 2 प्रवासी गंभीर; तर 5 किरकोळ जखमी झाले. ही आतापर्यंत घडलेली एकमेव घटना नाही. अशा अनेक घटना घडल्या आहेत. 

No photo description available.
गडचिरोली : येथील गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये तुटलेली सीट.

बसगाड्यांची दुरुस्ती नाही 

कित्येक बसगाड्या रस्त्यावर धावण्याच्या लायकीच्या नाहीत, तर उपप्रादेशिक परिवहन विभाग या बसगाड्यांना रस्त्यावर उतरण्याची परवानगी कशी देते, याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शुक्रवारी अपघात झालेल्या बसगाडीचे एक चाक निखळल्याप्रमाणे डगमगत होते, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची दुरुस्ती नीट होत नाही. या बसगाड्या धुळीने माखलेल्या असतात. त्या स्वच्छ करण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना त्या धुळीतच प्रवास करावा लागतो. 

Image may contain: one or more people, people sitting and indoor
गडचिरोली : चामोर्शी -मूल मार्गावर धावणाऱ्या या बसमध्ये एक सीटच नाही.

पावसाळ्यात गळते छप्पर 

काही बसगाड्यांचे छप्पर गळत असल्याने पावसाळ्यात बसच्या आत छत्री घेऊन बसावे लागते. काही बसगाड्यांच्या खुर्च्या निखळल्या आहेत. काही बसगाड्यांच्या खुर्च्याच नाहीत. एकूणच सगळी गैरसोय होत असून आता जिवाचाही धोका निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. 

हे वाचलंत काय? : देहविक्री व्यवसाय, प्रेयसी, तो अन्‌ खून
 

तिकीट परवडणारे नाही 

बदलत्या काळाची पावले ओळखून परिवहन महामंडळाने आपल्या धोरणात व बसगाड्यात फारसे बदल केले नाहीत. खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी हीच कमजोरी ओळखत अत्याधुनिक सुविधांनी युक्त वाहने प्रवाशांच्या दिमतीला उभी केली. नाही म्हणायला महामंडळाने शिवशाहीसारखी सुसज्ज बस आणली. पण, या बसचे तिकीट ग्रामीण प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नाही. 

हेही वाचा की : 'तो' बिबट्या ठरला अंधश्रद्धेचा बळी
 

कशी करणार स्पर्धा? 

शिवाय महामंडळाच्या या शिवशाही बसगाड्या व यापूर्वीच्या निमआराम बसगाड्याही काही वर्षांत भंगार होताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात बसमध्ये वाय-फायद्वारे वुट ऍपची सुविधा दिली होती. आता बहुतांश बसगाड्यातून या सुविधेचे डबेच अदृश्‍य झाले आहेत. मग, खासगी ट्रॅव्हल्सशी कशी स्पर्धा करणार, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wrecked vehicles run in Gadchiroli