"सन्मान'मध्ये नाही नावाला सन्मान 

"सन्मान'मध्ये नाही नावाला सन्मान 

नांदुरा (जि. बुलढाणा) : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जात आहे. पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंद प्रत्येक तहसीलअंतर्गत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. मात्र, नावात घोळ केल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहिला आहे. यावरून "सन्मान'मध्ये नाही नावाला सन्मान असेच दिसून येत आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी तालुक्‍यांतील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी तशी माहिती तहसील कार्यालयाला मराठीत सादर केली होती. परंतु, "सन्मान' संकेतस्थळावर माहिती इंग्रजीत सादर करावयाची असल्याने तहसीलने भाडे तत्वावर काही ऑपरेटरांची नियुक्‍ती केली आहे. त्यांनी मराठीतील नाव व माहिती इंग्रजीत करण्यासाठी "गुगल ट्रान्सलेट'चा वापर केला असल्याने नावांचा घोळ निर्माण झाला आहे. त्यातून नावाचे मजेदार किस्से हे संकेतस्थळ उघडल्याने बाहेर पडले आहेत. 

नांदुरा तालुक्‍यातील एकट्या फुली येथील सुभाष प्रल्हाद वाघ यांचे सुभाष प्रल्हाद "टायगर', दीपक यादव इंगळे यांचे "लाइट' यादव इंगळे, जगन्नाथ समाधान बोदडे यांचे जगन्नाथ "सॅटिसफेक्‍शन' बोदडे, गजानन पांडुरंग सातवचे गजानन पांडुरंग "सेवन्थ' असे नाव दिसून येत आहे. नावात केलेल्या चुकांमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. 

हे नमुना दाखल असले तरी अनेक गावांत नावाचा घोळ झाल्याने शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. आतातरी प्रशासनाने चूक दुरुस्त करून हा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी मागणी सर्व शेतकरी वर्गाकडून होत आहे. याबाबत तहसीलदार नांदुरा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

शेतकऱ्यांचे "सॅटिस्फॅक्‍शन' ऐवजी समाधान होणे गरजेचे 
यावर्षी पीक काढणीच्या वेळेस पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. नुकसानीची कोणतीही मदत मिळत नसल्याने किसान सन्मान निधी मिळेल व आधार होईल ही अपेक्षा असतानाच नावातील घोळामुळे हक्काचा निधी अडकला गेला आहे. दुसऱ्याच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. 

नावाची दुरुस्ती करण्यास सांगितले
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्री किसान योजनेसाठी शेतकऱ्यांची नावे ही मराठीत मागितली गेली. नंतर ही नावे व माहिती गुगल ट्रान्सलेटद्वारे भाषांतरीत करण्यात आली. यामुळे घोळ निर्माण झाला असून, नावे जुळत नसल्याने या योजनेचा लाभ आम्हाला मिळू शकला नाही. याबाबत तहसीलला चौकशी केली असता नावाची दुरुस्ती करण्याचे सांगितले गेले. 
- सुभाष प्रल्हाद वाघ, शेतकरी, फुली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com