कुटुंब न्यायालयात ‘या सुखांनो या’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नागपूर - कुटुंब न्यायालयाने ‘या सुखांनो या’ या संकल्पनेअंतर्गत राबविलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये २३ जोडप्यांचे पुनर्मीलन घडवून आणले. लहानशा कारणांवरून घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या जोडप्यांना सामंजस्याच्या माध्यमातून नव्याने संसार सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

क्षुल्लकशा कारणावरून होणाऱ्या भांडणामध्ये पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होऊ नये, या उद्देशाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २८ जोडप्यांनी हजेरी लावली. यापैकी २३ दावे निकाली काढण्यात आले. कुटुंब न्यायालयाच्या यशस्वी प्रयत्नांमुळे दोघांमध्ये असलेल्या मतभेदांची तडजोड करत मुलांना आपले आई-बाबा परत मिळाले.

मानसोपचारतज्ज्ञ मिलिंद आपटे यांनी जोडप्यांना मार्गदर्शन केले. मन आणि भावना यांची सांगड घालत योग्य निर्णय कसे घ्यावे, याबाबत उदाहरणांसह समजावून सांगितले. स्त्रियांमध्ये वयानुसार असुरक्षितता वाढत असल्याचे सांगत योग्य वेळी समुपदेशन घेतल्यास भावनिक गैरसमज दूर होऊ शकतो, असे आपटे म्हणाले. पती-पत्नीतील तणावावर प्रकाश टाकताना त्यांनी दोघांपैकी एकाने सामंजस्याने घेतल्यास कधीही वाद होणार नाही, असे सांगितले. 

प्रास्ताविक मुख्य न्यायाधीश ई. एम. बोहरी यांनी केले. संचालन ॲड. रश्‍मी खापर्डे यांनी केले. आभार ॲड. जयश्री महाजन यांनी मानले. यशस्वितेसाठी न्यायालयीन व्यवस्थापक डॉ. रसिका कस्तुरे, व्यवस्थापक सुनील काटेकर, अधीक्षीका संध्या देशपांडे, उषा नायडू, विश्‍वजित सुरकर यांनी सहकार्य केले.

Web Title: ya sukhano ya concept in family court