यशच्या मारेकऱ्याला दुहेरी फाशी

Yash-&-Santosh
Yash-&-Santosh

नागपूर - यश बोरकर या चिमुकल्याचे अपहरण करून खून करणारा संतोष कळवे (२०) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (बुधवार) दुहेरी फाशी सुनावली. संतोषवर दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी यशचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप होता. अपहरण करून खंडणी मागणे व खून करणे अशा दोन गुन्ह्यांसाठी ३०३ व ३६४ कलमांतर्गत संतोषला दुहेरी फाशी सुनावण्यात आली.

लहान मुलांचे अपहरण आणि खुनाच्या घटनांची मालिका नागपूरकर कधीही विसरू शकणार नाहीत. कुश कटारिया, युग चांडक या बालकांच्या अपहरण आणि खुनाने नागपूर शहर हादरले होते. याच मालिकेतील एक दुर्दैवी घटना म्हणजे यश बोरकर हत्याकांड होय. जिल्हा व सत्र न्यायालयात या बहुचर्चित हत्याकांडाच्या प्रकरणातील युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाला होता. त्यावर अंतिम सुनावणी आज असल्यामुळे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. 

११ जून २०१३ रोजी खापरी परिसरात ही घटना घडली होती. संतोष याची आई आजारी होती. त्याला आईच्या उपचारासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी पैशाची गरज होती. त्यामुळेच त्याने अपहरणाची योजना आखली. यश पाचवीचा विद्यार्थी होता. तो मित्रांसोबत खेळत असताना वडिलांनी त्याला बघितले होते. पण, सायंकाळ होऊनही यश घरी परतला नाही. रात्री १० वाजता यशच्या वडिलांना फोन आला. दोन लाख रुपये दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली. अनेकांनी यशला संतोषसोबत बघितले होते. त्यामुळे पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली.

अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यशचे अपहरण केल्यानंतर संतोष त्याला घरी घेऊन गेला. त्याला बळजबरीने दारू पाजली. सायंकाळी संतोष त्याला घेऊन मिहान परिसरात गेला. नाल्यात बुडवून त्याचा खून केला. मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो घरी परतला.  पोलिसांनी संतोषला अटक करून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य 
बहुचर्चित युग चांडक हत्याकांडाप्रमाणेच हे प्रकरण होते. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अपेक्षा केली जात होती. विशेष सरकारी वकील विजय कोल्हे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपीला फाशीचीच मागणी केली होती. आज न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपीच्या विरोधातील सबळ पुरावे लक्षात घेऊन दोन कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असल्यामुळे संतोषला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी यश बोरकर याच्या कुटुंबीयांनीही केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com