अमरावतीत यशोमती ठाकूरसह अपक्षांची हॅट्ट्रिक, चौकार|Election result 2019 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

आमदार यशोमती ठाकूर यांनीसुद्धा तिवसा मतदारसंघात त्यांचा असलेला दबदबा परत एकदा दाखवून दिला. शिवसेनेचे राजेश वानखडे यांचे कडवे आव्हान असतानाही यशोमती ठाकूर यांनी आपल्या कामांच्या जोरावर हा मतदारसंघ काबीज करून हॅट्ट्रिक साधली.

अमरावती : तिवसा मतदारसंघाच्या आमदार ऍड. यशोमती ठाकूर व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक साधली असून, अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी चौकार मारला आहे. सलग चौथ्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा विक्रम त्यांनी केला. विशेष म्हणजे, रवी राणा व बच्च कडू हे अपक्ष आमदार आहेत. 
बडनेरा मतदारसंघातून दोनवेळा युवा स्वाभिमानच्या झेंड्याखाली निवडणूक जिंकणाऱ्या रवी राणा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत अर्धांगीनी नवनीत राणा यांना निवडून आणून सर्वांना आश्‍चर्यचकित केले होते. यावेळी माजी आमदार स्व. संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्याशी त्यांची बडनेरा मतदारसंघात लढत होती. ही लढत अतिशय अटीतटीची झाली. मात्र, त्यात रवी राणा यांनी बाजी मारून हॅट्ट्रिक साधली. 
अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना यंदा कॉंग्रेसच्या बबलू देशमुख व शिवसेनेच्या नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांचे जबर आव्हान होते. त्यामुळे याठिकाणी मतविभाजनाचा फटका बच्चू कडू यांना बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. परंतु, त्यातून सुद्धा बच्चू कडू यांनी आपली बाजू भक्कमपणे सांभाळून सलग चारवेळा याच मतदारसंघातून विजयी होण्याचा मान पटकावला. एवढेच नव्हे तर शेजारीच असलेल्या मेळघाट मतदारसंघातसुद्धा बच्चू कडू यांनी माजी आमदार राजकुमार पटेल यांना उमेदवारी देऊन प्रहारच्या माध्यमाने आणखी एक आमदार जिल्ह्याला दिला. 
आमदार यशोमती ठाकूर यांनीसुद्धा तिवसा मतदारसंघात त्यांचा असलेला दबदबा परत एकदा दाखवून दिला. शिवसेनेचे राजेश वानखडे यांचे कडवे आव्हान असतानाही यशोमती ठाकूर यांनी आपल्या कामांच्या जोरावर हा मतदारसंघ काबीज करून हॅट्ट्रिक साधली. तिवसा, मोर्शी, अमरावती, भातकुली अशा चार तालुक्‍यांत या मतदारसंघांचा व्याप असतानाही आपल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी येथे यश मिळविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashomati Thakur, bacchu kadu, ravi rana won