esakal | यवतमाळ, चंद्रपुरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; दोन डॉक्‍टर ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ, चंद्रपुरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; दोन डॉक्‍टर ताब्यात

यवतमाळ, चंद्रपुरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; दोन डॉक्‍टर ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ-चंद्रपूर : कोरोना (coronavirus) रुग्णावर उपचारासाठी प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा (Remedivir injection) काळाबाजार करून ते दामदुप्पट भावाने विकण्यात येत असल्याचे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आले. या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील एक डॉक्टर व एक फार्मसिस्ट तर चंद्रपूर शहरातील एक डॉक्टर आणि दोन परिचारिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Yavatmal and Chandrapur The black market of Remdesivir injection)

राज्यात रेमडेसिव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा चार ते पाचपट दराने त्याची विक्री सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरात दुर्वांकुर मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिव्हिरची दुप्पट दराने विक्री सुरू होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी एलसीबी पथक कळंबमध्ये धडकले.

हेही वाचा: काय सांगता! तब्बल ४० टक्के कोरोना योद्ध्यांनाही अजून मिळाली नाही लस

सावंत पवार याच्या मेडिकलमध्ये ग्राहक बनून गेले. त्याला रेमडेसिव्हिरचे तीन इंजेक्‍शन मागितले असता, त्याने १२ हजारप्रमाणे ३६ हजारांची मागणी केली. पोलिसांनी सापळा रचून सावंत पवार व डॉ. अक्षय तुंडलवार यांना ताब्यात घेतले.

रेमडेसिव्हिर कोठून आणले, असे विचारले असता डॉ. तुंडलवार याने सौरभ मोगरकर (रा. कळंब) याचे नाव सांगितले. पोलिसांनी घरून त्याला ताब्यात घेतले. त्याने यवतमाळ येथील बिलकीस बानो मोहम्मद इक्‍बाल अन्सारी या महिलेकडून इजेक्शन घेत असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यात आली. तिची मुलगी नागपूर येथे नर्स आहे. तिच्या माध्यमातून पुढील तपास पोलिसांनी करीत आहे.

चंद्रपुरातही डॉक्‍टरसह दोन परिचारिका ताब्यात

चंद्रपूर शहरात ‘क्राईस्ट’ रुग्णालयातील प्रभारी डॉक्‍टर जावेद सिद्दीकी यांना पोलिसांनी रेमडेसिव्हिरच्या काळाबाजारप्रकरणी रात्री अटक केली. तसेच दोन परिचारिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनी वर्णाल आणि रेखा डकरेट्टीवार अशी त्यांची नावे आहेत. क्राईस्ट रुग्णालयाला मुख्य शासकीय कोविड केंद्राइतकेच महत्त्व आहे. इथली खाटांची आणि उपचाराची क्षमता लक्षात घेता हे केंद्र कोविड उपचारात मोठे योगदान देत आहे.

शुक्रवारी रात्री अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौकात रेमडेसिव्हिर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना छापा टाकून ताब्यात घेतले. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार माघ काढत पोलिस क्राईस्ट रुग्णालयापर्यंत पोहोचले. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

(Yavatmal and Chandrapur The black market of Remdesivir injection)