esakal | यवतमाळ :अखेर कुख्यात चोरट्यांची टोळी गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

- 11 घरफोडींचे गुन्हे उघडकीस
- साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
- टोळी प्रमुखावर दीडशे गुन्हे दाखल
- महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशात केली चोरी
- एलसीबी पथकाची कारवाई

यवतमाळ :अखेर कुख्यात चोरट्यांची टोळी गजाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : भरदिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचा माल अवघ्या काही तासांत लंपास करणाऱ्या आंतरराज्य कुख्यात टोळीस गजाआड करण्यात आले. ही कारवाई पुसद येथे "एलसीबी'च्या पथकाने केली. या टोळीने पुसद, उमरखेड, महागाव या परिसरात एकूण 11 घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. यात तीन चोरट्यांसह आठ लाख 50 हजर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन संशयितांचा समावेश

टोळीचे प्रमुख किशोर वायाळ (रा. मेरा, ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार व राजू इंगळे (दोघेही रा. बर्हाई ता. मेहकर जि. बुलडाणा) यांचा संशयितांत समावेश आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक कार, दोन दुचाकी, 97 ग्रॅम सोने व 550 ग्राम चांदी असा एकूण आठ लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीचा प्रमुख किशोर वायाळ याच्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतसुद्धा सुमारे दीडशे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, कविश पाळेकर, मोहम्मद ताज, दिगंबर पिलावन यांनी केली.

पाच चोऱ्या भोवल्या

पुसद शहरातील शिवाजीनगर व श्रीनगर या भागात शुक्रवारी (ता. 15) अवघ्या चार तासांत भरदिवसा पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. पथक मागील काही दिवसांपासून दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या मागावर होते.

वेश बदलून लावला छडा

"एलसीबी'च्या पथकाने आरोपींची गोपनीय माहिती काढली. ते मेहकर तालुक्‍यातील रहिवासी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मेहकर येथे त्यांनी चार ते पाच दिवस तळ ठोकला व वेशांतर करून तीन आरोपींना अटक केली. टोळीप्रमुख किशोर वायाळ हा मेहकर येथून चार ते पाच जणांची टोळी घेऊन अवघ्या काही मिनिटांतच मुद्देमाल लंपास करायचा. यासाठी तो दुचाकी व कारचा वापर करीत होता.