बेंबळावर आढळला दुर्मीळ अल्बिनो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

यवतमाळ : येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या जलाशयात "रेड क्रेस्टेड पोचार्ड' (मोठी लालसरी) या जातीतील दुर्मीळ अल्बिनो हा स्थलांतरित पाणपक्षी आढळला. दैनंदिन पक्षिनिरीक्षणादरम्यान सोमवारी (ता. 17) प्राणिशास्त्राचे प्रा. डॉ. प्रवीण जोशी व पक्षिमित्र सुयोग घोडके (पुणे) यांनी ही नोंद घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेच्या नोंदीनुसार दुर्मीळ अल्बिनोची भारतातील पहिली नोंद खानदेशातील हतनर धरणाजवळ झाली होती. त्याआधारे या पक्ष्याची विदर्भातील पहिली तर देशातील दुसरी नोंद आहे. "रेड क्रेस्टेड पोचार्ड' हे लाल रंगाचे तर त्यांच्याच जातीतील परंतु दुर्मीळ अल्बिनो हा पांढऱ्या रंगाचा असतो. डॉ. जोशी यांच्या मते, बेंबळा प्रकल्पाचा प्रचंड मोठा परिसर पाणपक्षी, बदक प्रकारातील पक्ष्यांसाठी आवश्‍यक असलेल्या जलीय वनस्पतींसाठी पोषक आहे. यामुळे सैबेरिया, युरोप, रशिया, मंगोलिया व युरेशिया या देशांतील पक्षी शीतऋतूत या जलाशयावर येतात. यावर्षी दहा हजारांपेक्षा अधिक "रेड क्रेस्टेड पोचार्ड' बेंबळा प्रकल्पावर वास्तव्यास आहेत. त्यात आढळलेला अल्बिनो हा पक्षी दुर्मीळ आहे. याची नोंद संशोधन पत्रिकेत करणार असल्याचे डॉ. प्रवीण जोशी व सुयोग घोडके यांनी सांगितले.

Web Title: yavatmal bird news