esakal | यवतमाळात नगरसेवकांच्या हाती झाडू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यवतमाळात नगरसेवकांच्या हाती झाडू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सणोत्सव तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत यवतमाळ शहरातील कचरा प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. त्यावर तोडगा काढून शहर स्वच्छ करावे, या मागणीसाठी नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी रविवारी (ता. एक) गांधीगिरी करीत येथील पाचकंदील चौक ते हनुमान आखाडा या नगरपालिकेसमोर असल्याचे रस्त्यांची स्वच्छता केली.
शहरातील स्वच्छता व कचरा संकलनाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. श्रीगणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी, नवरात्र असे महत्त्वाचे उत्सव तोंडावर आहेत. मात्र, स्वच्छतेचा मुद्दा निकाली निघालेला नाही. शनिवारी (ता.31) नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या विषयपत्रिकेवर कचऱ्याचा मुद्दा नव्हता. त्यामुळे नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. महत्त्वाचा प्रश्‍न असल्यानंतरही विषयपत्रिकेवर विषय नसल्याने नगरसेवकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. या विषयावरून नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात आरोपप्रत्यारोप झालेत. भाजपच्या नगरसेवकांनी उचललेल्या या मुद्दाला कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. वाद वाढल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी बहिर्गमन गेल्याची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. या मुद्दयावरून नगरसेवकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, रविवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत सामूहिक आंदोलन केले. नगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर असलेला कचरा सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वच्छ करीत प्रतिकात्मक आंदोलन केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत आंदोलन करण्याची अलीकडच्या काळातील हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल. या आंदोलनात प्रा. डॉ. अमोल देशमुख, वैशाली सवाई, शिवसेना गटनेते गजानन इंगोले, भाजप गटनेते विजय खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सपना लंगोटे, कॉंग्रेस गटनेते चंदू चौधरी, विशाल पावडे, संगीता कासार, शुभांगी हातगावकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक सहभागी झाले होते.

loading image
go to top