अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

येथील दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा टाकल्यापासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. प्रतिष्ठित म्हणून शहरात मिरविणारे आंबटशौकीन व्यक्तीच या कुंटणखान्याचे ग्राहक असल्याची चर्चा आहे. रात्रभरात आंबटशौकीन लाखोंची उलाढाल करीत असल्याने त्यांची विशेष बडदास्त ठेवली जात होती.

यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील कुंटणखाना सुरू झाल्यापासूनच वादग्रस्त राहिला आहे. नवीन ग्राहक आल्यानंतर त्याला खोलीत पाठविणे, त्याचे छायाचित्र काढणे व ब्लॅकमेल करून लाखोंची वसुली करणे आदी प्रकार घडल्याची चर्चा अनेकदा बाहेर आली. मात्र, कुणीही तक्रार करण्यास धजावले नाहीत. या व्यवसायात लाखोंची उलाढाल होते.

महिनाभरापूर्वी टाकलेल्या छापेमारीमुळे देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाशच करण्यात आला. मालकीण व सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, आदिलाबाद येथील ग्राहकाला रेकॉर्डवर घेऊन सोडून दिल्याने ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांच्याकडे सोपविला आहे.

Image may contain: one or more people and people sitting
संग्रहित छायाचित्र

आंबटशौकिनांचे धाबे दणाणले

पोलिस पथकाने हैदराबाद येथील युसुगुडा पॉश वस्तीतून रमेश भैरीवार ऊर्फ श्रीनिवास गौड याला ताब्यात घेतले होते. त्याने तपासादरम्यान मोबाईल क्रमांक देणाऱ्या एका एजंटचे नाव उघड केले. दरम्यान, पोलिसांच्या हाती काही प्रतिष्ठितांचे कॉल डिटेल्स आले. त्यामुळे आंबटशौकीन प्रतिष्ठितांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाईकडे लक्ष

या कुंटणखान्यात शहरातील तसचे ग्रामीण भागातील प्रतिष्ठित व्यक्ती गुरफटले असल्याचे दिसून येते. देहविक्रयाच्या व्यवसायात इतर राज्यातील मुलींना आणल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पैशाच्या आमिषापोटी काही तरुणी या कुंटणखान्यात गुंतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आंबटशौकिनांना येथे मोठा लाभ झाला आहे. या प्रतिष्ठितांमध्ये बड्या व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे.

वाचा की : मुलीचे शाळेतून अपहरण करण्याची धमकी; उकळली नऊ लाखांची खंडणी

तरुणींना पैशाचे आमिष

देहविक्रयात ओढलेल्या तरुणींना जादा पैसे देण्यात येत होते. प्रत्यक्षात त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. ग्रामीण व शहरी भागातील तरुणींसह परराज्यांतील मुलींनाही शिताफीने या व्यवसायात आणल्याचे सांगितले जाते. सामाजिक स्वास्थ धोक्‍यात आणणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal : celebrity consumer atrract of kuntankhana