यवतमाळ : तब्बल 52 वर्षांनंतर बदलला इतिहास | Election Results 2019

file photo
file photo

यवतमाळ : यवतमाळ विधानसभा जिल्ह्याचे मुख्यालय असलेला मतदारसंघ असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. मतदारसंघात काय घडामोडी घडतात, याची उत्सुकता जिल्ह्यातील प्रत्येकाला असते. यवतमाळ मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास एक अपवाद वगळता या मतदारसंघातून सलग दोन वेळा कुणालाही संधी मिळाली नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बदल केला आहे. 1962पासून ते 2014पर्यंत विधानसभेच्या 13 निवडणुका झाल्या. त्यात कॉंग्रेसला पाच वेळा, भाजप तीन, अपक्ष तीन, जनता दल व फॉरवर्ड ब्लॉक यांना प्रत्येकी एकवेळा आलटून पालटून मतदारांनी कौल दिला आहे. विशेष म्हणजे, अपक्ष निवडणूक लढणारे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी सलग दोन वेळा निवडून येण्याची किमया या मतदारसंघात केली होती. त्यांच्यानंतर तब्बल 52 वर्षांनंतर येरावार यांनी ही किमया साधली. शहरी व ग्रामीण अशी मतदारसंघांची सध्याची रचना आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची झाली. अखेरच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार, हे उमेदवारांनाही निश्‍चित होत नव्हते. पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचे लक्ष मतमोजणी केंद्राकडे लागले होते. पहिल्या फेरीपासून कॉंग्रेस आघाडीवर असल्याने पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला होता. विजयी रॅलीची तयारीही सुरू केली होती. अनेकांनी तर उमेदवाराचे प्रचार कार्यालय गाठून गुलालही उधळला होता. मात्र, अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये येरावार यांनी आघाडी घेतली. अखेर दोन हजार 626 मतांनी येरावार विजयी झाले. या विजयासोबत येरावार यांनी तब्बल 52 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास बदलला आहे. त्यामुळे आता मदन येरावार यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. विकासाला आणखी गती देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
बोरीने उलटवली बाजी
पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर आघाडीवर होते. 21व्या फेरीपर्यंत मताधिक्‍य चांगले वाढले होते. येथून भाजपचे "कमबॅक' सोपे नाही, अशीच चर्चा होती. मात्र, 22व्या फेरीत बोरी भागातील मतमोजणी झाली. त्यात कॉंग्रेसचा लीड अर्ध्यावर आला. त्यानंतर 28 फेरीपर्यंत आघाडी कमी होत गेली. अखेरच्या फेरीत भाजपला विजयी आघाडी मिळाली असली; तरी माजी आमदार संदीप बाजोरियांनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा जिल्हाभरात अधिक जोरात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com