यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भर पावसात केले नुकसानीचे सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आर्णी तालुक्‍यातील लोणबेहळ येथील नीलेश आचमवार यांनी जिल्हाधिकारी अतुल गुल्हाने यांना बुधवारी अकराला दूरध्वनी करून परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत माहिती दिली.

यवतमाळ/आर्णी : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस व सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने बुधवारी (ता. 30) भर पावसात थेट आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधून त्यांना धीरही दिला. 

Image may contain: 3 people, people smiling, outdoor

अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आर्णी तालुक्‍यातील लोणबेहळ येथील नीलेश आचमवार यांनी जिल्हाधिकारी अतुल गुल्हाने यांना बुधवारी अकराला दूरध्वनी करून परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी गुल्हाने स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक कोळपकर, विमा प्रतिनिधी, आर्णी तहसीलदार धीरज स्थूल, तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड, तलाठी सौ. पवार यांच्यासह प्रथम सुकळी व नंतर लोनबेहळ येथील शेतात गेले. 

त्यांनी सोयाबीन व कापसाच्या नुकसानाची मोका पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यानंतर कोसदनी व साकूर येथील शेतात पोहोचताच ढगाळ वातावरण तयार झाले. काही मिनिटांतच पावसाला सुरुवात झाली. पावसाची तमा न बाळगता शेतातील सोयाबीन व कापसाची पाहणी करताना जिल्हाधिकारी ओलेचिंब झाले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांना वाईट वाटले. झालेले नुकसान भरून निघणारे नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दोन दिवसांत संपूर्ण तालुक्‍यातील शेताच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात येईल आणि आलेले अहवाल त्वरित सरकारदरबारी पाठवण्यात येईल व मदतीची मागणी करण्यात येईल असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या चर्चेत साकूर येथील शेतकऱ्यांनी गावाजवळून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधून देण्याची मागणी केली. 
Image may contain: 5 people, people standing, plant, tree, outdoor and nature

यावेळी पुरुषोत्तम गावंडे यांच्यासह लोनबेहळ येथील शेतकरी नीलेश आचमवार, सुरेंद्र राऊत, शांतिलाल जयस्वाल, धीरज बघेल, योगेश तिवारी, शुक्‍ला, मोरे आदींसह कोसदनी येथील दीपक ठाकरे, अनिल ठाकरे, सरपंच दिनेश ठाकरे, देवेंद्र ठाकरे, साकूरचे सरपंच बाबाराव चव्हाण आदींची उपस्थिती होती. प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जवळपास एक लाख पाच हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानाचे अर्ज कृषी सहायक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

Image may contain: 2 people, people standing, plant and outdoor

आर्णी तालुक्‍यातील 105 गावांना फटका 
आर्णी तालुक्‍यात एकूण सात हजार 247 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच हजार 690 हेक्‍टरवरील सोयाबीन आणि एक हजार 557 हेक्‍टरवरील कापसाचा समावेश आहे. तालुक्‍यातील सर्व 105 गावांना पावसाचा फटका बसला असून बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन हजार 700 च्या घरात आहे. 

विमा नसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल काय? 
ज्या शेतकऱ्याने पीककर्ज घेतले नाही किंवा पिकांचा विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना कोणती मदत मिळेल, असा प्रश्‍न एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना विचारला. हा प्रश्‍न ऐकून जिल्हाधिकारीही पेचात पडले, त्यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे असल्याचे मत व्यक्त करून प्रश्‍नाला बगल दिली. त्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहिला. 

कृषी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मी पाहणी केली आहे. नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला पाठविण्यात येणार आहे. 
- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal collector crop survey conducted while rainfall