पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने गड राखला 

yavatmal : Congress wins by-election
yavatmal : Congress wins by-election

उमरखेड (जि. यवतमाळ) : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे ढाणकी जिल्हा परिषद, पंचायत समिती व आणि ब्राह्मणगाव पंचायत समितीच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. राज्यात सत्ता स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग या निवडणुकीत यशस्वी ठरला असून, कॉंग्रेसने आपला गढ कायम ठेवला आहे. 

ढाणकी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ढाणकी व ब्राह्मणगाव पंचायत समितीच्या जागेसाठी मागील निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्यामुळे कॉंग्रेसच्या तिन्ही सदस्यांचे पद रद्द करून पोटनिवडणूक लावण्यात आली होती. या निवडणुकीत भाजप व महाविकास आघाडीत सरळ लढत झाली. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ढाणकी जिल्हा परिषद गटासाठी महाविकास आघाडीच्या श्‍यामला अविनाश कमठेवाड यांनी भाजपाच्या पुनम राजकुमार गरुडे यांचा 679 मंतानी पराभव करून विजय संपादन केला. श्‍यामला कमठेवाड यांना चार हजार चारशे सताहत्तर तर पुनम गरुडे यांना तीन हजार सातशे सन्यानऊ हजार मते मिळाली.

ढाणकी पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या जिजाबाई दत्ता खोकले या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या शारजा शेषेराव कोमवाड यांचा एकशे पंधरा मतांनी पराभव केला. जिजाबाई खोकले यांना 359 तर शारजा कोमवाड यांना 244 मते मिळाली. ब्राम्हणगाव पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीच्या अनिता संजय मार्लेवाड यांनी भाजपच्या शोभा संजय गरुडे यांचा अवघ्या 36 मतांनी पराभव केला. अनिता मार्लेवाड यांना तीन हजार आठशे पंधरा तर शोभा गरूडे यांना तीन हजार सातशे एकोनऐंशी मते मिळाली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरशी

निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, तातुजी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे, राष्ट्रवादीचे राजूभय्या जयस्वाल, पंचायत समिती सभापती प्रवीण पाटील मिरासे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व आमदार नामदेव ससाने यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात भाजपचा पराभव करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरशी केली. 

कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस व तहसीलदार रूपेश खंडारे यांनी निवडणूक निकालाचे काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com