
Crime : भावाच्या अंत्यसंस्कारात रडण्याची नौटंकी केली, पण एक चुक अन्...; अखेर 'त्या' खूनाचा उलगडा
दिग्रस : तालुक्यातील विठोली येथील सार्थक गावंडे याच्या खून प्रकरणात चुलत भाऊ अरविंद उर्फ गुड्डू गावंडे याला अटक करण्यात आली. कमी वयात होणारी प्रगती आणि वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादात खून केल्याची कबुली दिली.
बयानातील विसंगतीमुळे या खुनाचे रहस्य दीड महिन्यानंतर उलगडले. शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी आणल्यावर अंत्यसंस्कारात रडण्याची नौटंकी चुलत भावाने केली. मात्र, या घटनेचा कोणताही पश्चापात मारेकर्याला नाही, अशी पोलिस सूत्रांची माहिती आहे.
सार्थकचा मारेकरी असलेला चुलत भाऊ गुड्डू हा मधूमेहचा रुग्ण आहे. खून झाल्याची माहिती घरी मिळाल्यावर मृतदेह बघण्यापूर्वीच प्रकृती बिघडल्याचे कारण पुढे करून रुग्णालयात उपचारासाठी भरती झाला. दुसर्या दिवशी शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी येण्यापूर्वी गुड्डूदेखील रुग्णालयातून घरी आला. त्यानंतर अंत्यसंस्काराच्यावेळी कुटुंबीयांसह रडून गावकर्यांसमोर झालेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
आपल्या हातून काहीच घडले नाही, अशा आविर्भावात तो वावरत होता. सार्थकचा खून करतेवेळी घातलेले टी-शर्ट त्याने घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गावातील काहींनी त्याला काय जाळत आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी काकाने पत्रावळ्या जाळण्यास सांगितल्याचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत सार्थकच्या वडिलांनी त्याला कोणतेच काम सांगितले नव्हते, असे स्पष्ट झाले.
यानंतरच्या त्याच्या बयानात विसंगती आढळून आली. गुड्डूने दिलेली उत्तरे पोलिसांना संशयास्पद वाटू लागली होती. सार्थकचा खून कुर्हाडीने केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी कुर्हाडीचा शोध सुरू केला. गावातील विहिरीत लोहचुंबकाच्या साहाय्याने पाहणी केली. मात्र, कुर्हाड आढळली नाही. खून प्रकरणाचा उलगडा झाल्यावर कुर्हाड शोधण्याचे आव्हान दिग्रस पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
वर्षभरापूर्वी बनविली होती कुर्हाड
विठोली शिवारातून तुपटाकळीपर्यंत जाणार्या नाल्यात खुद्द उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्यासह पोलिसांनी कुर्हाडीच्या शोधासाठी पायी चालत पाहणी केली होती. गेल्या एका वर्षापूर्वी गुड्डूने शेतीच्या कामासाठी नवीन कुर्हाड बनवून आणल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा सार्थकचा चुलत भावावर संशयाची सुई फिरत होती.