आणखी किती रडवशील रे पावसा? उद्‌ध्वस्त शेतकऱ्याचा प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

आठवडाभरापासून मुक्कामी आलेला अवकाळी पाऊस चांगलाच ठाण मांडून बसला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाची माती केली. शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असते. मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांची गुंतवणूकच पाण्यात बुडविली आहे. 

यवतमाळ : डोळ्यातदेखील मातीमोल होणारे पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या आहेत. अवकाळीने सर्वच हिरावून नेल आहे. आता पुन्हा काही शिल्लक राहिले नाही. तरीही अवकाळी थांबण्याचे नाव घेत नाही. आणखी किती रडवशील रे पावसा? असा प्रश्‍नच जणू हतबल झालेला शेतकरी वरूणराजाला विचारत आहे.

Image may contain: 2 people, people standing, plant, sky, outdoor and nature

अवकाळीने शेतकऱ्यांची गुंतवणूक पाण्यात 
आठवडाभरापासून मुक्कामी आलेला अवकाळी पाऊस चांगलाच ठाण मांडून बसला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाची माती केली. शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असते. मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांची गुंतवणूकच पाण्यात बुडविली आहे. 

Image may contain: 5 people, outdoor and food

पावसाळ्यात रूसलेल्या पावसाने अवकाळी रूद्ररूप धारण केले आहे. आठवडाभरापासून सातत्याने विजांच्या कडकडाटासह कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या अश्रूंची त्यात भर पडली आहे. शेतातील पिकांकडे बघून बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान बघावयास मिळाले. दिवाळीला मुलांसाठी कपडे, गोडधोड पदार्थासाठी किराणा, फटाके घेण्याचे स्वप्न गावांगावांत रंगविल्या जात असतानाच अवकाळीचा कोप झाला. घरात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या सोयाबीनवर बुरशी चढली. काढणीच्या प्रतीक्षेतील सोयाबीनला कोंब फुटले. तर, सोयाबीनची बोंड सडायला लागली.

गेल्या पाच वर्षांपासून एकही हंगाम साथ देत नाही. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पाचवीलाच पुजला आहे. त्यात अवकाळीने कहरच केला. हातातोंडाशी आलेला घास पुरता हिसकावून नेला. 

आठवडाभरापासून मुक्काम; आर्थिक गणित कोलमडले 
रक्ताचे पाणी करून बहरलेल्या पिकांची माती झालेली बघून शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र झाली आहे. जिल्हा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाचा पाऊस पडत आहे. पीकविमा शेतकऱ्यांच्या छळवणुकीचे साधन ठरत आहे. महसूल प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार पंचनामे केल्या जात आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल की नाही, याचे उत्तर धुसरच आहे. सत्ताधारी केवळ घोषणांचा पाऊस पाडतात. तर, विरोधक तेवढ्यापुरते ओरड करून आपली बाजू सांभाळून घेतात. शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. 

विजांच्या कडकडाटासह झोडपले 
अवकाळी पावसाबरोबर विजांचा कडकडाट जीवावर उठत आहे. शनिवारी (ता.दोन) दुपारी पुन्हा विजांचा कडकडाटांसह आलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. दिवाळीच्या सुट्यांत बाहेरगावी जाण्याचा बेत आखत असलेल्यांच्या उत्साहावरदेखील विरजण पडत आहे. 

महसूल राज्यमंत्री म्हणाले, विमा कंपन्यांना सोडणार नाही 
दारव्हा (जि. यवतमाळ) : अवकाळी पावसाने शेती पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. अशावेळी विमा कंपन्यांनी दावा मंजुरीसाठी शेतकऱ्यांची नाहक अडवणूक केल्यास विमा कंपन्या व त्यांच्या प्रतिनिधींना सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी (ता. 2) दारव्हा तालुक्‍यातील लोही येथे दिला. 

Image may contain: 8 people, people sitting, crowd and outdoor

संजय राठोड यांनी तालुक्‍यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत देण्याची ग्वाही दिली. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने नुकसानाचे क्षेत्र वाढत आहे. पिकांच्या या नुकसानाची वर्गवारी करता येणार नसून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे हाच पर्याय आहे.

शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, हीच शासनाचीही भूमिका असल्याने शेतकऱ्यांनी नुकसानाचे छायाचित्र घेऊन साध्या कागदावर अर्ज करावा. सोयाबीन, कापसासह आंतरपिके, फळबागा, भाजीपाला सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. नुकसानग्रस्त भागांत तत्काळ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही संजय राठोड यांनी नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. त्यांनी शनिवारी तालुक्‍यातील लोही, तरणोळी आदी गावांतील नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी केली. 

उंबरठा उत्पन्न महत्त्वाचे 
सप्टेंबर, ऑक्‍टोबरच्या पीक पाहणी परिस्थितीवर प्रशासनाने पैसेवारी जारी केली आहे. यामुळे सध्याच्या स्थितीचा त्यावर परिणाम झालेला नाही. अंतिम आणेवारीत या सर्व बाबींचा समावेश राहणार आहे. पिकांचे नुकसान, उंबरठा उत्पन्न अशा बाबींचा विचार करूनच अंतिम पैसेवारी काढली जाणार आहे. यामुळे आता सर्वांच्या नजरा अंतिम पैसेवारीकडे लागल्या आहेत. 

अवकाळी पावसाने शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा व भाजीपालावर्गीय पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे मी प्रत्यक्षात मी पाहणी करताना बघितले आहे. जवळपास 80टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सरसकट मदत मिळाल्याशिवाय आता उभा राहू शकणार नाही. त्यामुळे सरकारदरबारी हा नुकसानाचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देऊ.' 
- संजय राठोड, 
महसूल राज्यमंत्री, म. रा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal district farmer's crop destroyed