गोतस्कराच्या वाहनाने पोलिसाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातून जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनाने तपासणी नाक्‍यावर तैनात पोलिसाला चिरडले. ही घटना रविवारी (ता. २०) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्‍यातील खांबाडा चेकपोस्ट येथे घडली. प्रकाश जयराम मेश्राम (वय ३५) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते भद्रावती पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातून जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनाने तपासणी नाक्‍यावर तैनात पोलिसाला चिरडले. ही घटना रविवारी (ता. २०) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्‍यातील खांबाडा चेकपोस्ट येथे घडली. प्रकाश जयराम मेश्राम (वय ३५) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते भद्रावती पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

बल्लारपूर येथे शासकीय इतमामात मृत प्रकाशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दारूतस्करांनी एका पोलिस अधिकाऱ्याला चिरडल्याची घटना घडली होती. दोन महिन्यांत दुसरी घटना घडल्याने पोलिस प्रशासन हादरले आहे. जिल्ह्यात दारूबंदी आहे. लगतच्या सीमेवरून दारूची तस्करी होऊ नये म्हणून सीमावर्ती भागात तपासणी नाके सुरू केले आहेत. वणी नाका येथे काल, रविवारी रात्री पोलिस कर्मचारी दिनेश मेश्राम, सूरज मेश्राम वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी वणीकडून दोन वाहने भरधाव येताना दिसले. पोलिसांनी वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही वाहनांनी भरधाव पळ  काढला. या कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरोरा पोलिसांना दिली आणि वाहनांचा पाठलाग करणे सुरू केले.

वरोरा पोलिसांनी ही माहिती खांबाळा चेकपोस्टवर तैनात पोलिसांना दिली. या नाक्‍यावर प्रकाश मेश्राम, कमलेश मोहमारे तैनात होते. त्यांना वरोरा-नागपूरमार्गे भरधाव वाहने येताना दिसली. 

पोलिस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांनी बॅरिकेट्‌सच्या मागे राहून बॅटरी व लाठीच्या सहाय्याने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेट्‌स लावेपर्यंत एक वाहन निघून गेले. एम.एच.४० बी. एल. ०१३४ क्रमांकाच्या वाहनचालकाने बॅरिकेट्‌स उडवित शिपाई प्रकाश मेश्राम यांच्या अंगावर गाडी चढविली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वाहन आणि २४ जनावरे जप्त केली. यावेळी इम्तियाज अहमद फैयाज, मोहम्मद रजा अब्दुल जब्बार कुरेशी यांना अटक करण्यात आली. 

दुसऱ्या वाहनातील आरोपींच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन आणि वरोरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे एक असे तीन पथके गठित केली. मोहम्मद फहीम शेख अजीम शेख, आदिल खान ऊर्फ मोहम्मद कादिर खान या आरोपींना कामठी येथून अटक करण्यात आली. वाहनसुद्धा ताब्यात घेण्यात आले.

आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास परिवीक्षाधीन पोलिस अधिकारी नवनीत कावत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Web Title: Yavatmal district police crushed the vehicle carrying cattle