Election Results 2019 : यवतमाळ जिल्ह्यात भाजपला दोन जागांवर नुकसान?

राजकुमार भीतकर
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलताना दिसत आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी बाराव्या फेरीत सहा हजार मतांची आघाडी घेतली आहे. या ठिकाणी कॉंग्रेसचे माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके माघारले आहेत.

यवतमाळ : 2014च्या विधिमंडळात जिल्ह्यातील सातपैकी भाजपचे पाच, शिवसेनेचे एक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक असे आमदारांचे पक्षीय बलाबल होते. परंतु, आज जाहीर होत असलेल्या निकालात भाजपला किमान दोन जागांवर नुकसान होताना दिसून असून महाआघाडीने तीन जागांवर आघाडी कायम ठेवली असून, सेना आपला गड राखण्याचा प्रयत्न करीत आहे.
जाहीर होत असलेल्या निकालावरून जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलताना दिसत आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी बाराव्या फेरीत सहा हजार मतांची आघाडी घेतली आहे. या ठिकाणी कॉंग्रेसचे माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके माघारले आहेत. यवतमाळ विधानसभेतून कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर पाचव्या फेरीत 2000 मतांनी पुढे असून येथे भाजपचे उमेदवार व पालकमंत्री मदन येरावार माघारले आहे. परंतु, येरावार सहाव्या फेरीत आघाडीच्या दिशेने कूच करीत असल्याची माहिती आहे. दिग्रस विधानसभेतून सेनेचे संजय राठोड नवव्या फेरीत 22818 मतांनी आघाडीवर असून त्यांनी अपक्ष व भाजप बंडखोर माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांना मागे टाकले आहे. मात्र, यावेळी संजय राठोड यांचे मताधिक्‍य कमी होताना दिसत आहे. तर पुसद विधानसभेतून नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंद्रनील नाईक 8510मतांनी आघाडीवर असून त्यांचे चुलतबंधू भाजपचे उमेदवार विद्यमान विधान परिषद सदस्य नीलय नाईक माघारले आहेत. वणी विधानसभेत सप्तरंगी लढत असून भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार तिसऱ्या फेरीअखेर 2515 मतांनी आघाडीवर आहेत. तर, केळापूर-आर्णी विधानसभेतून तिसऱ्या फेरीअखेर कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे आघाडीवर असून त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. संदीप धुर्वे यांना मागे टाकले आहे. तर, उमरखेड विधानसभेतून भाजपचे नामदेव ससाने 2473 मतांनी आघाडीवर असून त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार विजय खडसे यांना मागे टाकले आहे. या सातही मतदारसंघाचा विचार करता असे लक्षात येते की, जिल्ह्यात यावेळी भाजपला किमान दोन जागांवर नुकसान होत असून सेनेला व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपला दिग्रस व पुसदचा गड राखण्यात यश मिळत आहे. तर, यवतमाळ व केळापूर-आर्णी विधानसभेत भाजपला नुकसान होताना दिसत आहे. राळेगावमधून राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू असून त्यांचे मताधिक्‍य प्रत्येक फेरीत वाढत आहे. तर, उमरखेडमधून भाजपचे नामदेव ससाने यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, वणीतील निकालाबद्दल अद्याप स्पष्टता दिसून येत नाही. दुपारी लवकरच सर्व ठिकाणचे निकाल लागणार असून चित्र स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal district trends, Election Results 2019