थंडीत मटकी खा तंदुरुस्त राहा, हे आहेत फायदे 

दिनकर गुल्हाने 
Friday, 3 January 2020

थंडीने अंगात जणू हुडहुडी भरलेली. अशावेळी कारला रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या खवय्यांना मोड आलेल्या मटकीने भुरळ न घातली तरच नवल. कानटोपरे घातलेला अभिषेक अनुरथ बोराडे श्रीरामपूर चौकीवर मोड आलेल्या मटकीचा स्टॉल लावत मटकी बहाद्दरांची आतुरतेने वाट पाहत आहे. मोट आलेल्या मटकीच्या उसळामुळे खवय्यांना वेगळीच मेजवानी मिळत आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : अभिषेक मोड आलेल्या मटकीचा शुभ्र ढीग उंच उंच चढवतो. त्यावर मटकीचे मोड अर्थातच अंकुर अधिकच खुलून दिसतात. सहाजिकच मटकीची उसळ आवडणाऱ्या मंडळीचे पाय या स्टॉलकडे हळूच वळतात. या अंकुर आलेल्या मटकीची उसळ झणझणीत होत असल्याने खवय्यांची मोठी पसंती मिळते. त्यामुळे सकाळी अभिषेकच्या मोड आलेल्या मटकीवर खरेदीसाठी उड्या पडतात. 

अभिषेक हा मूळ वसमतचा रहिवासी. केंब्रिज कॉलेजमध्ये बारावी कॉमर्सला शिकतो. मात्र "कमवा व शिका' या तत्त्वांतर्गत तो मटकी विक्रीचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून पुसद येथे करीत आहे. त्याचे वडील अनुरथ बोराडे मागील तीन वर्षांपासून वसमत येथील मोड आलेल्या मटकी विक्रीचा व्यवसाय करतात. तसेच त्यांचे दोन भाऊ श्‍याम व दत्ता यांचे वणी व पांढरकवडा येथे मोड आलेल्या मटकीची विक्री करतात. 

दररोज 15 किलो मटकीची विक्री 

अभिषेकने मिळकतीसाठी मटकी विक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. दररोज किमान पंधरा किलो मोड आलेल्या मटकीची विक्री होते. सोबतीला अंकुरलेली मेथी, बरबटी, चना, वाटाणा ही कडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. प्रतिकिलो 80 रुपये भावाने मोड आलेल्या मटकीची विक्री होते. यातून किमान पंधराशे रुपये मिळतात व साधारणत दररोज सहाशे ते सातशे रुपयांची मिळकत होते. सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास विक्री केल्यानंतर अभिषेक भाड्याच्या खोलीत अभ्यास करतो. मटकीला मोड आणण्याची प्रक्रिया त्याला चांगली ठाऊक आहे. 

Image may contain: plant and food
पुसद : उसळ बनविण्यासाठी तयार केलेली मोड आलेली मटकी. 

मटकी अशी भिजवावी 

रात्रीला मटकी थंड पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी पाण्यातून काढून कापडी पिशवीत बांधून ठेवले की दुसऱ्या दिवशी सकाळी छान मोड आलेली मटकी तयार होते. या अंकुरलेल्या मटकीपासून झणझणीत उसळ तयार करताना गृहिणीही आनंदित होतात. गॅसवरील मटकी उसळचा सुवास घरात दरवळला की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. 

कमी शिजवलेली मटकी चवदार 

अर्धवट शिजवलेली मटकी अथवा मटकीचे सूप खूपच चवदार असल्याने नाश्‍त्यासाठी हा सर्वांच्याच आवडीचा मेनू आहे. कुडकुडणाऱ्या थंडीत गरमागरम मटकीची पिवळी झणझणीत उसळ लहान मुले, आजारी व्यक्ती व घरातील सर्वांनाच आवडते. थंडीत मोड आलेल्या मटकीची विक्री वाढल्याची अभिषेक सांगतो. 

असे का घडले? : प्लीज तू घरी परत ये, अन्‌...

गुणकारी मटकी! 

भारतीय आहारात मटकीचा समावेश होतो. तसेच मोड आलेल्या मटकीच्या गुणधर्मात वाढ होते. मटकीत भरपूर प्रोटिन्स असतात. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. जे मांसाहार करीत नाहीत, त्यांच्यासाठी प्रोटिनची कमतरता मटकीने भरून काढता येते. यातील अमिनो ऍसिड्‌सने नखे, केस मजबूत होऊन सौंदर्य वाढवते. फायबर युक्त मटकी रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते.

क्‍लिक करा : मुसळधार पाऊस, थंडी अन्‌ ते चौघे, वाचा काय झाले...

मधुमेहींनाही फायद्याचे  

त्यामुळे मधुमेहींना मोड आलेली मटकी खाण्याचा सल्ला दिला जातो. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात व रक्तदाब नियंत्रित ठेवतात. मटकी लोहचा स्रोत असल्याने अँनिमियापासून संरक्षण मिळते. झिंकमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हो... ट्रेस वाटत असेल तर मोड आलेली मटकी नक्की खा, असाच सल्ला आहार तज्ज्ञ देतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal : Eat matki and keep fit, these are the benefits