शेतातून काढले 15 किलो सोने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील नांदगव्हाण शिवारातील एका शेतातून तब्बल 15 किलो सोने काढल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यामुळे गुप्तधनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील नांदगव्हाण शिवारातील एका शेतातून तब्बल 15 किलो सोने काढल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यामुळे गुप्तधनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
नांदगव्हाण येथील ज्ञानेश्‍वर पवार या शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून दोघांनी गुप्तधन काढून नेल्याची तक्रार केली होती. त्यावरून गुरुवारी (ता.5) पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. तक्रारीवरून नांदगव्हाण येथील किसन पवार व हिंमत जाधव या दोघांना ताब्यात घेण्यात आले. शेतकरी ज्ञानेश्‍वर पवार यांना त्यांच्या शेतात दहा ते 12 जण पूजापाठ करून गुप्तधन काढत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ शेत गाठले, तर संशयित खड्डा खोदताना दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काहींना बोलावून त्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी आम्ही नव्हे, तर बाहेर गावातील लोकांनी 15 किलो सोने काढून नेले व आणखी 15 किलो शिल्लक असल्याचे सांगितले, अशी तक्रार पोलिसात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. घटनास्थळावर मोठा खड्डा खोदून बुजविला होता. झाडाखाली मूर्तीची पूजा केलेली होती, बाजूला चूल मांडून दहीभाताचे बोने शिजवून टाकले आदी बाबी आढळल्या. याशिवाय घटनेच्या दिवशी त्या शेताजवळ कार दिसून आल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण गुप्तधनाचेच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Yavatmal guptadhana news