होय, आम्हीच दिला "शेतकरी नेता' 

राजकुमार भीतकर 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नाना पटोले लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात लढले. विधानसभेत भाजपने त्यांच्यासमोर तगडा उमेदवार देऊन आव्हान निर्माण केले होते. सतत लढवय्या स्वभाव असलेल्या नानांनी मात्र कधीच हार न मानता निकराची झुंज दिली. ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ते नेहमीच आंदोलन करीत आले आहेत. यामुळे आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासात यवतमाळ जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. यवतमाळ जिल्हा त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी नसली तरी मात्र प्रेरणाभूमी नक्कीच आहे. 

यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी झाल्याने भंडरा जिल्ह्यासह विदर्भात आनंद पसरला आहे. मुळात नानांची कर्मभूमी भंडारा जिल्ह्यातील साकोली असली तरी त्यांना "शेतकऱ्यांचा नेता' अशी खरी ओळख यवतमाळ जिल्ह्यानेच दिली आहे. 

हेही वाचा - जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष : नाना पटोलेंचा प्रवास 

साकोली तालुक्‍यातील सुकळी येथे फाल्गूणराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा जन्म 5 जून 1963 मध्ये झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते नानाभाऊ म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. विद्यार्थी संघटनेत काम करीत असताना 1990 मध्ये सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढविली व विजयी झाले. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

Image may contain: 9 people
यवतमाळ : गुलाबी बोंडअळीच्या आक्रमनानंतर शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीकडून घेण्यात आलेल्या 'कापसाचा चक्रव्यूह' या कार्यक्रमाला उपस्थित नाना पटोले व माजी आमदार वामनराव कासावर. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर वेळप्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याची गर्जनाच त्यांनी सर्वप्रथम खवतमाळ जिल्ह्यातील टिटवी या गावातून केली होती. यवतमाळ जिल्ह्यातील विविध शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना लोकांनीच "शेतकरी नेते' अशी बिरुदावली लावली. त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वाला ऊर्जा व प्रेरणा मिळाली. किसान कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचा जिल्ह्यातील जनतेने आनंद व्यक्त केला. नानांचे आणि यवतमाळचे ऋणानुबंध यानिमत्ताने चर्चिले जाऊ लागले आहे. 

अधिक माहितीसाठी - मायबाप सरकार... आमच्याकडेही लक्ष द्या 

18 सप्टेंबर 2017

नाना पटोले यांचा यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश झाला तो शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या माध्यमातून. 16 सप्टेंबर 2017 रोजी घाटंजी तालुक्‍यातील टिटवी येथे प्रकाश मानगावकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. मृत्युपूर्वी त्यांनी सागाच्या पानावर "मोदी सरकार... कर्जासाठी आत्महत्या' अशी अक्षरे असलेला मजकूर चुन्याने लिहून ठेवला होता. शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे समन्वयक देवानंद पवार यांनी याप्रकरणी पंतप्रधानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मानगावकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रथमच खासदार नाना पटोले टिटवी येथे 18 सप्टेंबर 2017 रोजी आले. 

अधिक वाचा - पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार देणार 

... अन्‌ खासदारकीचा राजीनामा

मानगावकर या शेतकऱ्याच्या उघड्यावरील संसार बघून नानांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी खिशात हात टाकला व पन्नास हजार रुपयांचे बंडल काढून कुटुंबाला आर्थिक मदत केली. त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी वेळप्रसंगी खासदारकी सोडावी लागली तरी चालेल अशी गर्जना केली होती. काही दिवसांतच त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, तेथेही त्यांचे समाधान झाले नाही. भाजप सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप करीत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असलेल्या खासदारांचेही पंतप्रधान ऐकत नसल्याने राजीनामा दिल्याचे ते जाहीर सभांमधून सांगू लागले. त्यामुळे त्यांना भाजपमधून टोकाचा विरोध होऊ लागला. येथूनच तत्त्वासाठी सत्तेतून बाहेर पडणारा शेतकरी नेता म्हणून त्यांची चर्चा होऊ लागली. 

अवश्य वाचा - नाना भाऊ, आता जरा दमानं घ्या... 

12 एप्रिल 2018

घाटंजी तालुक्‍यातील राजुरवाडी येथे 10 एप्रिल 2018 रोजी शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यांनी पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येला "मोदी सरकार जबाबदार' असल्याचा आरोप केला होता. 12 एप्रिल 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळला एका खासगी बॅंकेच्या उद्‌घाटनासाठी येणार होते. चायरे यांच्या आत्महत्येने वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी शेतकरी न्याय हक्क समितीचे समन्वयक देवानंद पवार यांना अटक केली होती. शंकर चायरे यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नव्हते. अखेर मुख्यमंत्र्यांनीच आपला दौरा रद्द केला. 12 एप्रिल 2018 रोजी नाना पटोले यवतमाळला आले. त्यांनी चायरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या जयश्री नावाच्या मुलीला नोकरीवर घेण्याची अट प्रशासनासमोर ठेवली. प्रशासन नमले व मुलीला रेमंडमध्ये नोकरी मिळाली. 

उघडून तर बघा - ठरलं... हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून 

गुलाबी बोंडअळीची धग ठेवली कायम

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या विषबाधेने 22 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. हजारोंच्या संख्येत शेतकरी जिल्हा रुग्णालयात भरती होते. शेतकरी नेते आंदोलन करीत होते. शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने हा विषय लावून धरला होता. या विषयाची गंभीरता ओळखून नाना यवतमाळला आले होते. त्यांनी दाखल रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर हे आंदोलन तीव्र करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. दुसऱ्याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटे पहाटेच यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मृताच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली तर बाधितांना पाच हजार रुपये दिले. कीटकनाशक विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या एकाही कुटुंबातील व्यक्ती दिवाळीला उपाशी राहू नये म्हणून त्यांनी 600 पोते तांदूळ पाठविले. ते शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने त्या सर्वांच्या घरी पाठविले. कीटकनाशक विषबाधा व त्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या आंदोलनाची धग नानांनी कायम ठेवली. 

Image may contain: 4 people, indoor
यवतमाळ : कीटकनाशक विषबाधा प्रकरणी पत्रकारांशी संवाद साधताना तत्कालीन खासदार नाना पटोले व शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने समन्वयक देवानंद पवार. 

"शेतकरी समिती'तून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद

उमरखेड तालुक्‍यातील सावळेश्‍वर येथील शेतकरी माधव रावते यांनी 14 एप्रिल 2018 रोजी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली होती. या घटनेला घेऊन नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातला होता. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, कीटकनाशक बिषबाधेने शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू, गुलाबी बोंडअळी आणि दुष्काळी परिस्थिती आदी प्रमुख विषयांवर "सरकारमामा'ने वृत्त दिले होते. त्या वृत्तांचा आधार घेऊन नाना पटोले यांनी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे नेते देवानंद पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनाची धक कायम ठेवली. त्यामुळे नाना पटोले, देवानंद पवार व शेतकरी आंदोलन असे समीकरणच तयार झाले होते. कोणत्याही पदावर नसताना या सर्व आंदोलनाचे नेतृत्व करण्याची संधी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने नानांना उपलब्ध करून दिली होती. त्यांना या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करता आला. 

सर्वाधिक आंदोलने यवतमाळ जिल्ह्यातच

यवतमाळपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या साकोली येथील एका नेत्याची "प्रेरणाभूमी' यवतमाळ जिल्हा कसा असू शकतो, यावरही चर्चा रंगू लागली आहे. मात्र, नानांनी शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक आंदोलने यवतमाळ जिल्ह्यातच केली आहेत. त्यांना यवतमाळ जिल्ह्यानेच शेतकऱ्यांचे दु:ख काय असते याची जाणीव करून दिली. त्यांच्या मतदारसंघात धानासाठी केलेले आंदोलन सोडले तर विदर्भातील शेतकऱ्यांचे दु:ख पांघरून दिल्लीला जाण्याची प्रेरणा ही त्यांनी यवतमाळनेच दिली होती. 

आंदोलकांची भूमी बनली "नानां'चे प्रेरणास्थान

यवतमाळ जिल्हा विविध आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील आंदोलनाची दखल इतिहासाने घेतली आहे. स्वातंत्र्यानंतर विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे वेगळ्या विदर्भासाठीचे आंदोलनही याच भूमितून केले. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. त्यांच्या मार्गदर्शनात शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी एक चळवळ उभी केली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी आंदोलन केले होते. निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या आंदोलन एकेकाळी गाजले. दारूबंदीचे आंदोलनही यवतमाळातूनच सुरू झाले. मेधा पाटकर व योगेंद्र यादव यांनी या आंदोलनाला हजेरी लावली. त्यानंतर विषबाधा, गुलाबी बोंडअळी आणि दुष्काळ जाहीर करण्यासाठी देवानंद पवार यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची धग महाराष्ट्रभर पोहोचली. एक हिवाळी अधिवेशनच या विषयावर गाजले. राज्यातील वीसपेक्षा जास्त मंत्र्यांनी त्यावेळी यवतमाळला भेट दिली. अशी ही आंदोलकांची यवतमाळची भूमी नाना पटोले यांची प्रेरणास्थान राहिली आहे. 

कॉंग्रेसने केला शेतकरीपुत्राचा सन्मान

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर नाना पटोले कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आले. त्यांनी नाना पटोले यांची शेतकरी आंदोलनाची कारकीर्द बघता व शेतकऱ्यांविषयी त्यांचा मनात असलेली तळमळ बघता राष्ट्रीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्षपद बहाल केले. कॉंग्रेसने एका शेतकरीपुत्राचा सन्मान केला. अध्यक्ष झाल्यावर देश फिरून त्यांनी किसान कॉंग्रेसची बांधणी केली. महाराष्ट्रात चार विभागासाठी चार अध्यक्ष नेमले. शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे नेते देवानंद पवार यांची विदर्भ किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal Nana Patole inspired land