यवतमाळात दोन तलाव फुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कहरच केला आहे. पुराचे पाणी दिग्रस, आर्णी, उमरखेड व पांढरकवडा शहरांसह अनेक गावांत शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबीय उघड्यावर आली असून, काहींनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला आहे. चंद्रपूर, वर्ध्यातही पावसाने हजेरी लावली.

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कहरच केला आहे. पुराचे पाणी दिग्रस, आर्णी, उमरखेड व पांढरकवडा शहरांसह अनेक गावांत शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबीय उघड्यावर आली असून, काहींनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला आहे. चंद्रपूर, वर्ध्यातही पावसाने हजेरी लावली.
दारव्हा तालुक्‍यातील दोन पाझर तलाव फुटल्याने 194 जनावरे दगावली. 1,386 घरांची पडझड झाली. 248 कुटुंबीय बाधित झाली आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. 16) पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला. उमरखेड तालुक्‍यातील सुकळी (ज.) येथे पुरात अंकुश माधव साबळे (वय 26) हा तरुण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. महागाव तालुक्‍यातील नदीकाठच्या 15 गावांतील चाळीसहून अधिक घरांत पाणी शिरले. शिवाय तिवरंग व वाकान या गावांचा संपर्क तुटला आहे. पांढरकवडा तालुक्‍यात पैनगंगा नदी काठावरील अर्ली व हिवरी गावांत पाणी शिरल्याने तेथील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक बंदी झाली आहे. शेतातील पिके पाण्याखाली आली असून, घरांची पडझड झाली आहे. राजुरा तालुक्‍यातील रामनगर येथील झोपडी पडल्याने महिला गंभीर जखमी झाली. मारडा येथील घनश्‍याम उरकुडे, नानाजी गिनगुले, देविदास तुरणकर, देवराव देवाडकर, संभा मडावी, येरगव्हाण येथील नलिनी बावणे, तिरुपता रामटेके यांच्या घराच्या, तर धानोरा येथील सुधाकर बोढे व कळमना येथील वसंता सपाट यांच्या गोठ्याची भिंत कोसळली.
वर्धा ः अनेक दिवस हुलकावणी दिल्यानंतर गुरुवारी (ता. 16) आणि शुक्रवारी (ता. 17) जिल्ह्यात श्रावणसरींनी हजेरी लावली. पावसाचा जोर नसल्यामुळे वातावरणातील उकाडा काही प्रमाणात कायम आहे. शुक्रवारी (ता. 17) सकाळी आठपर्यंत मागील 24 तासांत जिल्ह्यात 9.31 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: yavatmal news

टॅग्स