सख्या चुलतभावांचे मृतदेह विहिरीत आढळले

राजकुमार भिटकट
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ढाणकी लेंडीनाडा परिसरातील घटना

उमरखेड : दोन सख्या चुलत भावांचे मृतदेह विहरित आढळून आल्याची घटना रविवारी (ता. 22) सकाळी येथील ढाणकी रस्त्यावरील लेंडीनाला परिसरात उघडकीस आली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. इंद्रजित भीमराव रुडे (वय 25) व बिन्नी दारा रुडे (वय 22) दोघेही रा. गुलाबसिंग रुडे नगर (तांडा) उमरखेड अशी मृत चुलत भावांची नावे आहेत.

मागील तीन दिवसांपासून (ता. 20) ते दोघेही सकाळी दहापासून बेपत्ता होते. त्यांची मोटरसायकल व चपलासुद्धा लेंडीनाल्याला लागून असलेल्या विहिरीजवळ आढळून आल्या होत्या. त्यामुळे विहिरीत काल दिवसभर त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, मृतदेह हाती लागले नाहीत.

आज सकाळी सातदरम्यान दोघांचेही मृतदेह विहिरीत वर तरंगताना आढळले. मृत दोघाही चुलत भावांना मात्र पोहणे येत नव्हते. नेमका हा प्रकार कसा घडला, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. या दोन्ही चुलत भावांच्या मृत्यूमुळे मात्र लहानशा गुलाबसिंगरुडे तांड्यावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: yavatmal news double murder in umarkhed

टॅग्स