सर्वसमावेशक साहित्यामुळे लोकशाही समृद्ध: मुख्यमंत्री

वणी (जि. यवतमाळ) : येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आदी.
वणी (जि. यवतमाळ) : येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आदी.

विदर्भ साहित्य संमेलनाचे वणी येथे उद्घाटन
(राम शेवाळकर परिसर)


वणी (जि. यवतमाळ): ‘भारतीय संस्कृतीला मराठी साहित्याने जपले आहे. वणी नगरी हे साहित्याची खाण आहे. सर्वसमावेशक साहित्यामुळे लोकशाही समृद्ध झाली आहे. मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात. कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील प्राचार्य राम शेवाळकर परिसरात आयोजित 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.19) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, संमेलनाचे मुख्य संयोजक माधव सरपटवार, कार्याध्यक्ष वामन तेलंग, शाखाध्यक्ष दिलीप अलोणे, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक शुभदा फडणवीस आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘या वणी नगरीने साहित्यातील अनेक रत्ने दिलीत. ही वंदनाची भूमी आहे. ऐतिहासिक व साहित्यप्रेमी नगरीत हे संमेलन होत आहे. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले लोकनायक बापूजी अणे, राम शेवाळकर व वसंत आबाजी डहाके यांची ही भूमी आहे. विदर्भात झाडीपट्टी, नाट्य महोत्सव, दंडार यासह वेगवेगळ्या नाट्यसंस्कृती रंगभूमीचे वेगळेपण येथे पाहायला मिळते. कविवर्य सुरेश भट, ग्रेस यांनी मराठी मनाला वेड लावले. रसिकांच्या मनाला अत्यंत सुखद असे संमेलन येथे होत आहे.

येत्या तीन दिवसांत अनेक परिसंवाद, कविसंमेलन, दोन अंकी नाटक येथे होत आहेत. येथील साहित्य हे केवळ कल्पनाविलास नाही, तर घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब त्यात उमटत असते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. समाजमाध्यमांमुळे मुलभूत साहित्य, समाजाला आकार देणार्‍या साहित्याचे काय होणार, याचा विचार येतो. मराठी माणसांमुळे येथील साहित्य व संस्कृती जिवंत आहे’, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वणीकरांनी अतिशय चांगले संमेलन येथे आयोजित केले. या संमेलनाला मनापासून शुभेच्छा देऊन संमेलनाचे उद्घाटन झाले, असे त्यांनी जाहीर केले.

संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे म्हणाले की, ‘क्रांती घडवून आणण्याची ताकद लेखकांमध्ये आहे. वणी हे कामगार क्षेत्र असतानाही येथे वाचनाची आवड आहे, हे येथे जमलेल्या गर्दीवरून दिसते. समाज घडविण्यामध्ये लेखकांचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक पुरातन साहित्य आजही उपलब्ध आहे. ही संतांची भूमी आहे’. विदर्भाने अनेक मोठमोठे लेखक, कवी दिलेत,‘ असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वागतपर भाषण केले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलन परिसरातील राम शेवाळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम शेवाळकर दिपस्तंभाला भेट दिली. शिवाय ‘बहुगुणी वणी‘ या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अभिजित अणे यांनी केले. गजानन कासावार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com