यवतमाळ : सात आमदारांच्या निधीला "ब्रेक'

चेतन देशमुख
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- राज्यातील सत्तासंघर्षाचा परिणाम
- शपथविधीनंतर मिळणार अधिकार
- राज्यात राष्ट्रपती राजवट
- सर्वाधिकार प्रशासनाकडे

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. मात्र नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झालेला नाही. जुन्या आमदारांचाही कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सात, तर पराभूत तीन अशा दहा आमदारांना मतदारसंघांत कुठलेही काम सुचविता येणार नाही. त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांची कोंडी झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 20 दिवसांचा कालावधी झाला आहे. या कालावधीत विधानसभा अतित्वात आलेली नाही. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झालेला नाही. त्यापूर्वीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशास्थितीत सर्वाधिकार प्रशासनाकडे गेलेले आहेत. परिणामी सद्यःस्थितीत लोकप्रतिनिधींना अद्याप कुठलेही अधिकार मिळालेले नाहीत.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न ते अधिकाऱ्यांपुढे मांडू शकतात. मात्र, निधी खर्च करण्याचे अधिकार या लोकप्रतिनिधींकडे यायचे आहेत. विधानसभा निवडणुकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मदन येरावार, दिग्रसमधून संजय राठोड, राळेगावमधून प्रा. डॉ. अशोक उईके, वणी विधानसभा मतदारसंघातून संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सलग विजयी मिळविला आहे. असे असले तरी त्यांना आमदार निधी खर्च करण्याचे अधिकार अद्याप मिळालेले नाहीत. त्यांचा जुन्या कार्यकाळातील निधी संपला आहे.

नव्या राज्यविधिमंडळातील सदस्य म्हणून त्यांचा शपथविधी अद्याप झालेला नाही. पुसद विधानसभा मतदारसंघामधून इंद्रनील नाईक, उमरखेडमधून नामदेव ससाणे पहिल्यांदाच विधिमंडळात पोहोचले आहेत.

आर्णीमधून माजी आमदार संदीप धुर्वे विजयी झाले असले; तरी या विधानसभेत ते नवे आमदार म्हणून आहेत. या सातही लोकप्रतिनिधींचा शपथविधी झालेला नाही. त्यामुळे मतदारसंघात आमदार निधीतून कामे सुचविण्याचे अधिकार अद्याप त्यांना मिळालेले नाहीत.

आर्थिक तरतूद नसल्याने जोपर्यंत सरकार अस्तिवात येत नाही, तोपर्यंत या आमदारांना आमदार निधीमधून कामे सुचविता येणार नाहीत. परिणामी ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकासकामांना सरकार येईपर्यंत ब्रेक लागणार आहे.

विधान परिषद सदस्य, खासदारांना अधिकार
विधानसभा सदस्यांना सध्या आमदार निधी नसला; तरी विधान परिषदेच्या सदस्यांना तो आहे. त्यांना त्यांच्या मतदारसंघात आपला निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत. याशिवाय, खासदारांनी आपल्या निधीतून कामे सुचविता येणार आहेत.

आमदारांचा जीव टांगणीला
तब्बल 20 दिवसांनंतरही सरकार कुणाचे राहील, याबाबत शाश्‍वती नाही. क्षणाक्षणाला सत्तासमीकरणाची सूत्रे बदलत आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांची अस्वस्थता वाढत आहे. लवकर सत्तास्थापनेचा तिढा सुटावा, अशी प्रार्थना नवनिर्वाचित आमदार करताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal: Seven MLAs fund 'break'