यवतमाळात महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म

सूरज पाटील
रविवार, 26 ऑगस्ट 2018

राणी प्रमोद राठोड (रा. चिखली, ता. दारव्हा), असे महिलेचे नाव आहे. राणी व प्रमोद या दाम्पत्याला पहिली भाविका नावाची दोन वर्षांची मुलगीच आहे. सदर महिला पाच महिन्यांची गर्भवती असताना तिची येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली.

यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूत झालेल्या महिलेने एकाचवेळी चार कन्यारत्नांना रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात रविवारी (ता. 25) दुपारी साडेबाराला जन्म दिला. त्या चारही मुली सुखरूप असून, डॉक्टरांच्या पथकामार्फत विशेष काळजी घेतली जात आहे.

राणी प्रमोद राठोड (रा. चिखली, ता. दारव्हा), असे महिलेचे नाव आहे. राणी व प्रमोद या दाम्पत्याला पहिली भाविका नावाची दोन वर्षांची मुलगीच आहे. सदर महिला पाच महिन्यांची गर्भवती असताना तिची येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली. त्याचवेळी चार गर्भ असल्याचे स्पष्ट झाले होते. महिलेची विशेष काळजी घेता यावी, यासाठी तिला 25 जूनलाच रुग्णालयात भरती करण्यात आले. आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने प्रमोद याने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन विवंचना मांडली. त्यांनी लगेच डॉक्टरांची भेट घेतली आणि महिलेच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. येथे उपचारास अडचण असल्यास मुंबईला नेण्याची तयारी राठोड यांनी दर्शविली. मात्र, डॉक्टरांनी काळजी घेण्याचा विश्‍वास देत येथेच उपचार केले. गेल्या अडीच महिन्यापासून अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. चव्हाण, डॉ. श्रीकांत वर्‍हाडे यांनी उपचार केले. माँ आरोग्य सेवा समितीचे विकी पोरटकर, पवन शेंद्रे, विकास क्षीरसागर यांनी प्रमोद राठोड यांना वेळोवेळी मानसिक बळ देत मदत केली. रविवारी (ता. 26) दुपारी साडेबाराला सामान्य प्रसूती झाली. 

अडीच महिने रुग्णालयात -
चार गर्भ असल्याने अडीच महिन्यापूर्वीच सदर महिलेला भरती करण्यात आले होते. तेव्हापासून पती प्रमोद पत्नीसह रुग्णालयात आहे. जणूकाही त्यांच्यासाठी रुग्णालयच घर झाल्याचा अनुभव दाम्पत्याने घेतला. चार मुली झाल्याचा आनंदच असल्याची प्रतिक्रिया प्रमोद राठोड याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

डॉक्टरांनी विशेष काळजी घेतल्याने 'डिलिव्हरी नॉर्मल' झाली. बाळाचे वजन कमी असल्याने त्यांना ‘एनआयसीयू’त ठेवण्यात आले आहे. आईची प्रकृती ठीक आहे. घाबरण्यासारखे काही नाही. 
- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, यवतमाळ.

Web Title: In Yavatmal a women gave birth to four daughters