हरभऱ्याला या वर्षी मिळणार 4400 रुपये भाव

विवेक मेतकर
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

अकोला - राज्यात हरभरा पिकाला यंदाच्या हंगामात 4300 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांखिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे.

अकोला - राज्यात हरभरा पिकाला यंदाच्या हंगामात 4300 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांखिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात 2014-15चे हरभऱ्याचे क्षेत्र हे 1.82 दशलक्ष हेक्‍टर व उत्पादन 1.62 दशलक्ष टन एवढे झाले. अकोला, दर्यापूर, लातूर व जळगाव ही महाराष्ट्रातील हरभऱ्याचे प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. राज्यात हरभऱ्याची पेरणी ऑक्‍टोबरचा दुसरा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा या दरम्यान होते, तर कापणी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केली जाते. जवळपास फेब्रुवारीनंतरच बाजारातील आवक सुरू होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व एनकॅप नवी दिल्ली कृषी विपणन केंद्राने बाजारपेठेतील मागील वर्षांच्या कालावधीत मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण करून केलेल्या अभ्यासाच्या आधारे काढलेल्या निष्कर्षानुसार बाजारपेठेतील वर्तमान स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात हरभऱ्याची फेब्रुवारी-मार्च या महिन्यात सरासरी किंमत जवळपास 4300 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्‍यता आहे. परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्यःस्थितीत हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम पिकांवर, किमतीवर होऊ शकतो.

सर्वांत मोठा उत्पादक देश
भारत हा जगातील सर्वांत मोठा हरभरा उत्पादक देश असून, एकूण कडधान्य उत्पादनात 40 टक्के वाटा भारताचा आहे. भारतात हभऱ्याचे वर्गीकरण देशी आणि काबुली या दोन प्रकारांत होते व प्रामुख्याने देशी हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. एकूण हरभरा उत्पादन 85 ते 90 टक्के होते, तर काबुलीचे 10 ते 15 टक्के आहे. जगातील हरभरा उत्पादनाच्या 90 टक्के उत्पादन भारत, तर तुर्कस्तान, कॅनडा, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये होते. भारतात 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उत्पादन घेतले जाते.

देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
भारतीय कृषी संचालयानुसार वर्ष 2014- 15 चे हरभऱ्याचे उत्पादन 8.28 दशलक्ष टन एवढे असून, वर्ष 2013-14 मध्ये 9.88 दशलक्ष टन होते. भारतातील एकूण उत्पादनापैकी 39 टक्के उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान 14 टक्के, महाराष्ट्र 11, आंध्र प्रदेश 4, उत्तर प्रदेश 10 टक्के आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो.

हरभऱ्याचे सरासरी उत्पन्न, शासनाचे आयात-निर्यात धोरण, किमतीचा कल व हवामानातील बदल या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यासाच्या निष्कर्षानुसार ही माहिती दिली जाते. या माहितीचा शेतकऱ्यांना विक्री आणि साठवणीच्या योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- डॉ. राजेंद्र देशमुख, (विभागप्रमुख, अर्थशास्त्र व सांखिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Web Title: this year will be at 4400 prices to gram