
सागरने दीड ते दोन महिन्यांत आतापर्यंत 100 किलो प्लॅस्टिक कचऱ्याचे पेट्रोलमध्ये रूपांतर केले आहे. स्वतःचे दुचाकी वाहन तो या पेट्रोलने चालवतो, असेही त्याने सांगितले.
धामना (लिंगा) (जि. नागपूर) : प्लॅस्टिकची समस्या खूपच गंभीर होत आहे. प्लॅस्टिकचे विघटन कसे करायचे, प्लॅस्टिकला पर्याय काय, यावर संशोधन सुरू असतानाच गोंडखैरी येथील सागर हमीद शेख या युवकाने प्लॅस्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. एक किलो प्लॅस्टिक कचऱ्यापासून 800 मिलि पेट्रोल तयार होते, असे त्याचे म्हणणे आहे.
सातवा वर्ग शिकलेला मोहम्मद सागर हमीद शेख (वय 20) मूळचा पश्चिम बंगाल येथील महेशनगर, चापराई, तालुका बिरपूर, जिल्हा नोदिया येथील रहिवासी आहे. गोंडखैरी येथे पॉवर हाउस प्लांटमध्ये बांधकाम सुपरवायझर म्हणून तो कार्यरत आहे. सागरने दीड ते दोन महिन्यांत आतापर्यंत 100 किलो प्लॅस्टिक कचऱ्याचे पेट्रोलमध्ये रूपांतर केले आहे. स्वतःचे दुचाकी वाहन तो या पेट्रोलने चालवतो, असेही त्याने सांगितले. हे पेट्रोल तो स्थानिक मित्रांना निःशुल्क देतो. पण, हे पेट्रोल वाहनांसाठी खरेच किती उपयोगी आहे, याच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत.
अशी सूचली कल्पना
प्लॅस्टिक कचऱ्यापासून पेट्रोल तयार करण्याची कल्पना त्याला यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून सुचली. लोखंडाचा 200 लिटरचा एक रिकामा ड्रम, स्टील पाइप, एक लाकडी पेटी, एक प्लॅस्टिक एअर पाइप, खाद्य तेलाचे चार रिकामे डबे, दोन छोटे पंखे, नारळदोरी आदी वस्तूंची खरेदी करून पेट्रोल काढण्याचा प्रयोग केला. प्लॅस्टिक कचरा ड्रममध्ये टाकून गरम करून त्याचे विघटन केले. अर्ध्या तासात त्याचे रूपांतर पेट्रोलमध्ये झाले, असा त्याचा दावा आहे. या प्रक्रियेत हवेचे प्रदूषणही होत नाही. सागर शेख याच्या म्हणण्यानुसार, सुमारे 100 किलो प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून 80 लिटर पेट्रोल तयार केले जाऊ शकते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाणीही लागत नाही.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानेच आपण प्लॅस्टिक कचऱ्यापासून पेट्रोलचा हा प्रयोग सुरू केला, असे सागर शेख याने सांगितले. यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नाही, असेही त्याने स्पष्ट केले. शासनाकडून मदत मिळाली तर नक्कीच यशस्वी होऊ. शासन दरबारी नेत्यांनी पुढाकार घेऊन मला मदत करावी. मदत मिळाली की, माझ्या या प्रयोगाच्या विविध चाचण्या करेल. त्या यशस्वी झाल्या तर इतर वाहनांमध्येही हे पेट्रोल वापरणे शक्य होईल, असे सागर म्हणाला.