सावधान..! तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरकैदेत 

अनिल कांबळे
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - सिग्नल तोडले, रॉंग साइडने गाडी दामटली आणि चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केली तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, असा समज झाला असेल तर तो आपल्या डोक्‍यातून आजपासून काढून टाका. शहरात जवळपास 80 टक्‍के सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून त्यात वाहतुकीचे नियम तोडल्याचे आढळल्यास घरी ई-चालान धडकू शकते. 

नागपूर - सिग्नल तोडले, रॉंग साइडने गाडी दामटली आणि चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केली तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, असा समज झाला असेल तर तो आपल्या डोक्‍यातून आजपासून काढून टाका. शहरात जवळपास 80 टक्‍के सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून त्यात वाहतुकीचे नियम तोडल्याचे आढळल्यास घरी ई-चालान धडकू शकते. 

उपराजधानीला "स्मार्ट सिटी'अंतर्गत चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मदत व्हावी, छोट्या-मोठ्या घटनांना, तसेच छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची शहराला नितांत गरज होती. त्यानुसार जवळपास साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सध्या शहरातील गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था नियंत्रणाचे काम आज बुधवारपासून सुरू झाले आहे. आजपासून चौकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक पोलिस "ई-चालान' कारवाई प्रायोगिक तत्त्वावर करणार आहे. 

कंट्रोल अँड कमांड रूम 
पोलिस नियंत्रण कक्षासमोर प्रशस्त दुमजली इमारतीत वाहतूक विभागाच्या नियंत्रणाखाली ट्रॅफिक कंट्रोल अँड कमांड रूम तयार करण्यात येत आहे. एल अँड टी कंपनीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. सुसज्ज अशा कंट्रोल रूमसाठी दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे. मोठमोठ्या स्क्रीन्सवर शहरातील प्रत्येक कॅमेऱ्याचे दृश्‍य टिपण्यात येणार आहे. 

वाहतूक कोंडीवर कक्षातून नजर 
सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीची कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येणार आहे. ज्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होईल, तेथे लगेच वाहतूक पोलिसांना वॉकीटॉकीवरून सूचना देण्यात येतील. अतिरिक्‍त कर्मचारी पाठवून वाहतुकीची कोंडी फोडण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस विभागही "स्मार्ट वर्क' करीत स्मार्ट सिटी बनविण्यासाठी हातभार लावत आहेत. 

सिग्नल जम्पिंग करू नये, लाइन क्रॉस करू नये, अतिवेगाने वाहने चालवू नका तसेच नियमांचे उल्लंघन करू नका. नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. अन्यथा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तुमच्यावर "वॉच' आहे. वाहतूक शाखेकडून आजपासून कॅमेऱ्यातून चालान बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. 
- डॉ. के. वेंकटेशम्‌, पोलिस आयुक्‍त 

Web Title: You are under CCTV camera