तुम्ही निधी देत नाही, जा आम्हीही देत नाही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

- मुख्यमंत्री पेयजल योजना होणार बंद! 
- जुनीच कामे अपूर्ण 
- ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठ्याचा पुन्हा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता 
- नागपूर जिल्हा परिषदेत 2016 मध्ये ही योजना लागू झाली

नागपूर : मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या योजनेला राज्याने निधीच दिला नसल्याने केंद्रानेही निधी रोखला. त्यामुळे ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठ्याचा पुन्हा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवून मुख्यमंत्री पेजयल योजना बोटावर मोजण्याइतकेच कामे पूर्ण करून बंद करण्यात आली. जुनीच कामे कशीतरी पूर्ण करून या योजनेची फाइलबंद करण्याच्याही सूचना मंत्रालयीन पातळीवरून असल्याची माहिती आहे. 

नागपूर जिल्हा परिषदेत 2016 मध्ये ही योजना लागू झाली. गावांची निवड करून ग्रामपंचायत ठरावासह यादी पाणीपुरवठा मंत्रालयाला पाठवायची होती. परंतु, या निवडीत वर्ष लोटले. 55 गावांची निवड करण्यात आली. यातील मोठ्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याचे ठरले. जवळपास 45 गावांत कामाला सुरुवात झाली. या सर्व प्रकाराला 2017 चा मुहूर्त निघाला. 18 महिन्यांत 45 योजना पूर्ण करायच्या होत्या. यातील दहाच्यावर योजना अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत. 

28 कोटी 54 लाख 68 हजार रुपयांचा खर्च या सर्व योजनांवर होणार आहे. सरकारकडून अद्याप निधी मिळाला नाही. कामे अपूर्ण असल्याने केंद्रानेही निधी रोखला. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय उर्वरित निधी न देण्याची केंद्राची भूमिका आहे. यामुळे अनेक कामे रखडणार आहेत. तर योजनेची काही कामे शिल्लक राहिल्याने ती पूर्ण करून या योजनेला कुलूप लावण्याची भूमिका या विभागाने घेतली. 

तालुका कामे 
भिवापूर 4 
उमरेड 4 
सावनेर 3 
कळमेश्‍वर 7 
नरखेड 7 
काटोल 4 
मौदा 2 
पारशिवनी 3 
रामटेक 7 
नागपूर ग्रामीण 4 
कामठी 4 
हिंगणा 2 
कुही 1 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You do not fund, we do not