नेरपिंगळाई (जि. अमरावती) : सततच्या नापिकीला कंटाळून व बोंडअळीमुळे शेतातील कापसाच्या नुकसानामुळे हताश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.3) दुपारी बाराच्या सुमारास नेरपिंगळाई शिवारातील शेतात ही घटना घडली. प्रशांत किसनराव दोरे (वय 37, रा. नेरपिंगळाई), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रशांत दोरे यांच्याकडे 8 एकर शेती आहे. त्यांनी शेती पेरण्याकरिता मागील वर्षी नातेवाईक व मित्रांकडून उसनवार पैसे घेतले होते. या पैशातून त्यांनी यंदा शेतात कपाशीची व सोयाबीनची लागवड केली. मात्र, काही दिवसांपूर्वी बोंडअळीमुळे त्यांच्या शेतातील कापसाचे नुकसान झाले. कापसाचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न त्यांना पडला होता. या तणावातच त्यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास नेरपिंगळाई शिवारातील त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. प्रशांत यांच्यामागे वृद्ध आई, पत्नी व 7 महिन्यांचा मुलगा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.