'मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केले, पण त्याचे प्रेम नव्हतेच', अशी चिठ्ठी सापडली आणि...

मंगळवार, 30 जून 2020

"तुझा कोणी दुसरा बॉयफ्रेण्ड आहे काय?' अशा प्रकारचे प्रश्‍न विचारून त्याने मानसिक त्रास दिल्यामुळेच माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप मृत युवतीच्या पालकांनी चांदूरबाजार पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केला.

बेलोरा (जि. अमरावती) : सोशल मीडियाच्या आजच्या युगात तरुण-तरुणींचे मन जुळण्यासाठी किंचितही वेळ लागत नाही. फेसबुक, व्हॉट्‌स ऍप तसेच इतरही ऑनलाईन मीडियावरून ओळख झाली की मैत्री आणि मैत्रीचे लगेच प्रेमात रूपांतर होते. चांदूरबाजार तालुक्‍याच्या एका गावातील युवतीचे दीक्षित नांदणे या 23 वर्षीय युवकासोबत असेच प्रेम झाले. बरेच दिवस त्यांचे प्रेमप्रकरण चालले. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा आधार काय? या नात्यांमध्ये विश्‍वास असतो कुठे? दोघांचे प्रेम काही दिवस बहरल्यानंतर प्रियकराच्या डोक्‍यात प्रेयसीबद्दल विनाकारण शंका यायला लागल्या. दोघांच्या प्रेम, घर संसाराच्या गोष्टी सुरू असताना हा मध्येच 'तुझा कोणी दुसरा बॉयफ्रेण्ड आहे काय?' असा प्रश्‍न विचारून तिला वारंवार त्रास द्यायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याचे हे त्रास देणे वाढतच होते. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराच्या संशयी स्वभावाला ती पुरती कंटाळली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेमाच्या गोष्टी कमी आणि कुरबुरीच जास्त व्हायच्या. एकमेकांत गुंतल्यानंतर त्या व्यक्‍तीकडून वारंवार संशय व्यक्‍त केला जात असल्याने असह्य होऊन पीडित युवतीने अखेर आत्महत्या केली.

सविस्तर वाचा - ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्‍लील व्हिडिओ नको काढू...'

पीडित युवतीच्या पित्याने चांदूरबाजार पोलिस ठाण्यात आरोपी दीक्षित नांदणे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलीसोबत दीक्षित नांदणे याने खऱ्या अर्थाने प्रेम न करता केवळ प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिच्याशी "ब्रेकअप' घेतला. "तुझा कोणी दुसरा बॉयफ्रेण्ड आहे काय?' अशा प्रकारचे प्रश्‍न विचारून त्याने मानसिक त्रास दिल्यामुळेच माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप मृत युवतीच्या पालकांनी चांदूरबाजार पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केला. 

आत्महत्येपूर्वी पीडित युवतीने स्वत:च्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे. त्यात "दीक्षित नांदणे याने प्रेमात दगा दिला. त्याच्या त्रासामुळेच मी आत्महत्या करीत आहे', अशा आशयाचा मजकूर असल्याचे, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी सांगितले. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीक्षित नांदणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.