संसार थाटण्यापूर्वीच युवतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

  • नुकतेच झाले होते साक्षगंध  
  • अजनीतील घटना 
  • आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

नागपूर : साक्षगंध झाल्यानंतर सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीने संसार थाटण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज सोमवारी अजनीत उघडकीस आली. पूनम वसंता शिंदे (वय 18) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंता शिंदे हे पत्नी, तीन मुली आणि चार मुलांसह कौशल्यानगरात राहतात. मोलमजुरी करून कुटूंबाचा गाडा हाकतात. मुलगी पूनम हिचे गेल्या दीड महिन्यांपूर्वी टोळीतील एका कबाडीचा व्यवसाय करणाऱ्या युवकासोबत साक्षगंध झाले होते. येत्या काही दिवसांवर तिचे लग्न होते. ती सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच 14 एप्रिलला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

बहिणीने फोडला हंबरडा :
लग्न ठरल्यानंतर काही दिवसांपासून पूनम तणावात होती. रविवारी दुपारी घरात कुणीही नव्हते तर 12 वर्षाची लहान बहिण अंगणात खेळत होती. ती पाणी पिण्यासाठी घरात आली असता तिला बहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिने मोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली. भाऊ बिरजू यांनी पूनमला खाली उतरवून मेडिकलला दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. 
 

Web Title: Young Girl Suicide Before Getting Married in ajani nagpur