पाठलाग करणाऱ्याच्या दिशेने तिने भिरकावला दगड, आणि एकाच दगडात... 

संतोष ताकपिरे  | Friday, 17 July 2020

पीडित मुलगी (वय 14) आपल्या चुलत बहिणीसोबत आजीच्या घराकडे पायी जात होत्या. दरम्यान नेहमीच त्यांच्या पाळतीवर असणारा आरोपी गोपाल सरकटे याने शासकीय रुग्णालयासमोरून दोघींचा पाठलाग करणे सुरू केले.

अमरावती : युवतींच्या छेडखानीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रोडरोमियोंच्या वाढत्या उपद्रवामुळे तरुणीही काहीशा खंबीर झाल्या असून, टवाळखोरांना धडा शिकवण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सडकछाप मजनूच्या गालाचा चावा घेतल्याची घटना ताजी असताना आणखी एका अल्पवयीन मुलीने रोडरोमियोला जन्माची अद्दल घडवली आहे. त्यामुळे परिसरात हा विषय चर्चिला जात आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय 14) आपल्या चुलत बहिणीसोबत आजीच्या घराकडे पायी जात होत्या. दरम्यान नेहमीच त्यांच्या पाळतीवर असणारा आरोपी गोपाल सरकटे याने शासकीय रुग्णालयासमोरून दोघींचा पाठलाग करणे सुरू केले. काही वेळ मागे मागे गेल्यानंतर तो त्यांच्या बाजूने समोर निघून गेला. त्यांनतर पुढे जाऊन पुन्हा त्यांच्या दिशेने जोरात गाडी घेऊन आला. त्या दोघी बहिणी जिवाच्या आकांताने धावत पुढे निघाल्या. परंतु, पाठलाग करणाऱ्या गोपालने मोठ्या बहिणीला निर्जनस्थळी अडवून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या बहिणीची छेडखानी होत असताना चिमुकली हा प्रकार पाहून रडत होती. 

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...
 

दरम्यान, अल्पवयीन मुलीने बहिणीला आपण सोडविले पाहिजे या विचाराने सरकटेच्या हाताला जोरदार झटका देऊन तिची सुटका केली. परंतु, त्याने पुन्हा दोघींचा पाठलाग सुरूच ठेवल्याने बचावासाठी पीडितेने (वय 14) एक दगड उचलून पाठलाग करणाऱ्याच्या दिशेने भिरकावला, तो दगड त्याच्या डोक्‍यावर बसून तो जखमी झाला. डोक्‍यावर मार बसल्याने आरोपीला चांगलीच अद्दल घडली. तेथून त्याने त्यांचा पाठलाग करणे थांबवले. 

घरी येऊन पीडितेने पालकांजवळ घडलेली संपूर्ण हकिकत सांगितली. पालकांनी अखेर खल्लार ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून सरकटेविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणींनीच रोडरोमियोंना अद्दल घडविल्याने परिसरात याबाबत चांगलीच चर्चा आहे. 
 

अविवाहित असल्याचे सांगून फसवणूक

 
युवतीच्या (वय 27) छेडखानीची दुसरी घटना धारणी परिसरात घडली. संशयित शेख फरीद शेख नजीर (वय 31, रा. कळमखार) याचे लग्न झाले असून, त्याला सात वर्षांची मुलगीही आहे. ही बाब त्याने लपवून ठेवली. त्यामुळे युवतीने शेख फरीदला न भेटण्याबाबत बजावले. त्यानंतरही त्याने युवतीला एसएमएस करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अडविले. लग्न करण्याची मागणी केली. पीडितेने नकार देताच, शेख फरीदने बळजबरीचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून धारणी ठाण्यात शेख फरीदविरुद्ध विनयभंगासह ऍट्रॉसिटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादित : अतुल मांगे