क्षुल्लक कारणावरून राजीवनगरात तरुणाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर ) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मंगळवारी (ता. 23) रात्री बाराच्या सुमारास हिंगणा मार्गावरील राजीवनगरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. घटनास्थळावरून पळून जात असतानाच दोन अल्पवयीन व त्यांचा साथीदार अशा तिघा आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. संदीप हिराचंद बावनकर (वय 24, बहुजननगर) असे मृताचे नाव असून या घटनेत दोन विधिसंघर्ष बालकांसह, सहा-सात आरोपी असल्याची माहिती आहे. त्यापैकी तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास संदीपच्या शेजारी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना त्याच्यासोबत एक मुलगी होती. एका अल्पवयीन आरोपीने त्या मुलीला पाहून टोमणा मारला. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा अल्पवयीन तेथून निघून थेट त्याच्या मित्राकडे गेला व त्याला संदीपसोबत झालेल्या भांडणाची माहिती दिली. त्यानंतर तिथे असणाऱ्या मित्रांनी समेट करण्याच्या निमित्ताने संदीपला हिंगणा मार्गावरील चौकात बोलावले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला राजीवनगराला लागूनच असलेल्या एका टेकडीवर नेले. तिथे संदीपला मारहाण करून खाली पाडले. एका विधिसंघर्ष बालकाने त्याच्या डोक्‍यावर मोठा दगड आपटून त्याला ठार केले व तेथून पळ काढला. परिसरात आरडाओरडा ऐकून कुणीतरी पोलिसांना सूचना दिली. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठविला.
आरोपी घटनास्थळ सोडून नागपूरच्या दिशेने पळ काढत असताना याच वेळी एमआयडीसीतील पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव घटनास्थळी मोटारसायकलने जात होते. त्यांना नेमके तीन आरोपी दुसऱ्या दुचाकीने जाताना दिसले. इतक्‍या रात्री जाणारे हेच आरोपी असावेत म्हणून त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबविले. त्यांची चौकशी केली तेव्हा तेच आरोपी असल्याचे लक्षात आले. उपनिरीक्षक जाधव यांच्या सतर्कतेमुळे घटनेच्या एका तासातच तीन आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागले. त्यांचे काही साथीदार मात्र फरार आहेत. पोलिसांनी आरोपी गणेश ऊर्फ बऱ्या रामजी दांडेकर (वय 24, राजीवनगर) व याच परिसरात राहणारी दोन विधिसंघर्ष बालके अशा तिघांना ताब्यात घेतले. घटनेतील मुख्य आरोपी ही दोन विधिसंघर्ष बालके आहेत. या दोघांवर चोरी, दरोडा, लूटमारसारखे गुन्हे दाखल आहेत. यातील एकावर हिंगणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. शिवाय आठ-दहा दिवसांपूर्वी त्याने राजीवनगरात एका व्यक्तीला चाकूने वार करून जखमी केले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याला मागील तीन दिवस दररोज चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. मंगळवारी दुपारी तो पोलिस ठाण्यात होता. त्याला समज देऊन घरी पाठविण्यात आले. रात्री त्याने पुन्हा हा गुन्हा केला, तसेच मृत युवक संदीपवरही चोरी, वाद यांसारखे गुन्हे दाखल आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man killed in Rajivnagar for trivial reasons