फुटबॉलच्या विकासासाठी तरुणांनो आगे बढो....

प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल

नागपूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (डब्ल्यूआयएफए) नवीन कार्यकारिणीत अनेक तरुण उत्साही पदाधिकारी असून, त्यांनी राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन डब्ल्यूआयएफएचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केले. फुटबॉलला देशातील "नंबर वन' खेळ बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले. डब्ल्यूआयएफएच्या शुक्रवारी पार पडलेल्या आमसभेनंतर पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी राज्यातील फुटबॉलच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजनांचा खुलासा केला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष असलेले पटेल म्हणाले, क्रिकेटनंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉलची गाडी योग्य दिशेने धावत आहे. परंतु, अजूनही विकासाला बराच वाव आहे. विशेषत: मैदाने व पायाभूत सुविधांची आवश्‍यकता आहे. सद्यस्थितीत फुटबॉल क्रिकेटनंतर देशातील "नंबर वन' खेळ आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही अजूनही खूप मागे आहोत. जोपर्यंत भारत विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी होत नाही, तोपर्यंत फुटबॉलचा विकास झाला असे म्हणू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. नागपूर-कामठी राज्यातील फुटबॉलचे हब असल्याचे सांगून पटेल म्हणाले, नागपुरात फुटबॉलसाठी अनुकूल वातावरण आहे. येथे मोठ्या प्रमाणावर चांगल्या स्पर्धांचे नियमित आयोजन होते. त्यामुळे या शहरात फुटबॉलचा विकास होणे गरजेचे आहे. येथे केवळ पायाभूत सुविधांचीच आवश्‍यकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यास फुटबॉल आणखी झेप घेऊ शकते. जिल्हा संघटनेतर्फे सहयोगनरात विकसित करण्यात येत असलेल्या मैदानासाठी त्यांनी मदत करावी, असेही ते यावेळी म्हणाले. ...तर नागपुरातही आंतरराष्ट्रीय सामने
नागपुरात शहराच्या अगदी मधोमध यशवंत स्टेडियम आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ते दुर्लक्षित आहे. अत्यंत कमी खर्चात या स्टेडियमचा कायापालट होऊ शकतो. स्टेडियमचा विकास आणि योग्य देखभाल झाल्यास येथे भविष्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने होऊ शकतात. याशिवाय मुंबईत होणारे रोव्हर्स चषक सामनेही नागपूर व राज्यातील अन्य शहरांमध्ये रोटेशनप्रमाणे खेळविले जाऊ शकतात, असे पटेल यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com