video : गंदा हैं पर धंदा हैं ये! 

नरेंद्र चोरे 
Saturday, 30 November 2019

खर्रा याणारे कोणत्याही ठिकाणी गेले की खर्रा कुठे मिळेल भाऊ असे विचारतात. मग त्यासाठी वाढीव किंमतही मोजायला तयार असतात. तंबाखू खाल्याने कॅन्सरसारखा आजार होतो हे माहित असतानाही खाणाऱ्यांची कमी नाही. खऱ्याच्या किमती गगणाला भिडल्या असल्या तरी खर्राशौकीन मात्र "शौक बडी चीज है' म्हणत खर्रा चघळतच आहेत. 

नागपूर : पुरुष म्हटलं की त्याला कोणते ना कोणते व्यसन जडलेले असते. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, खर्रा अशा व्यसनाच्या आहारी पुरुष गेलेला असतो. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले; मात्र दारू पिणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली सारख्या जिल्ह्यांत दारूबंदी आहे. मात्र, पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. यामुळेच सरकारने दारूसह तंबाखूजण्य पदार्थांवर बंदी घातली आहे. मात्र, शौकीन आपले शौक पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. 

खर्रा खाणारे कोणत्याही ठिकाणी गेले की खर्रा कुठे मिळेल भाऊ असे विचारतात. मग त्यासाठी वाढीव किंमतही मोजायला तयार असतात. तंबाखू खाल्याने कॅन्सरसारखा आजार होतो हे माहित असतानाही खाणाऱ्यांची कमी नाही. हीच गरज लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर जागोजागी हातपाय मारूनही नोकरी न मिळाल्याने हताश झालेल्या असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नाइलाजास्तव उदरनिर्वाहासाठी पानठेले थाटले आहेत.

काय आहे या लिंकमध्ये? - भाऊ, मी काय म्हणतो खऱ्यापेक्षा काजू खा ना...!

पानठेल्यांवर मिळणाऱ्या खर्ऱ्यांमुळे युवापिढीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असला तरी, त्यामुळे युवकांच्या हाताला कामे मिळून त्यांची बेरोजगारी दूर झाली, हेही नाकारता येत नाही.  "गंदा हैं पर धंदा हैं!' असे म्हणत खर्राविक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाचे समर्थन केले आहे. 

Image may contain: one or more people and people sitting

अनेक आई-वडिलांनी आपल्या पोटाला चिमटे घेत मुलांच्या शिक्षणावर भरमसाठ पैसा खर्च केला. एखादी सरकारी किंवा खासगी नोकरी मिळून मुलगा स्वत:च्या पायावर उभा राहावा, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊनही अनेक युवकांवर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचा करिअरमध्ये काहीच फायदा होत नसल्याचे बघून या युवकांनी अखेर रोजीरोटीसाठी पानठेल्याकडे आपला मोर्चा वळविला.

No photo description available.

अनेकांनी जागोजागी पानठेले व खर्ऱ्याची दुकाने थाटून उदरनिर्वाहाचे साधन शोधले. याचे उत्तम उदाहरण गोधनी रोडवर पाहायला मिळते. या रोडवर तब्बल 25 ते 30 युवकांनी छोटेमोठे पानठेले लावले आहेत. यामध्ये बहुतांश पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांचा अधिक भरणा आहे. उल्लेखनीय म्हणजे, काहींनी आयटीआयसारखे व्यावसायिक शिक्षणही घेतले आहे. तरीदेखील नोकरी न मिळाल्याने नाइलाजाने त्यांना खर्रा विकावा लागत आहे. 

 

मुळात पानठेला लावण्यासाठी भांडवल कमी लागते. 10 ते 20 हजारांत हा व्यवसाय सहज सुरू करता येतो. त्यामुळेच युवकांनी हा मार्ग अवलंबिला आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले खर्ऱ्याचे शौकिन आणि भरमसाठ नफा, यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या व्यवसायाकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे चित्र नजरेस पडते. केवळ नोकरदारच नव्हे, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीही खर्ऱ्याच्या आहारी गेले आहेत. खर्रा विकणे तरुणाईच्या आरोग्याशी खेळणे असले तरी, त्यात या तरुणांना काहीच गैर वाटत नाही. बेरोजगार राहण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहून चार-दोन पैसे कमावण्यात वाईट काय, अशा भावना काहींनी व्यक्‍त केल्या. 

ऐकावे ते नवलच! लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी "ड्रग्ज'चा वापर!

महिलाही खर्ऱ्याच्या आहारी

खर्रा किंवा पानशौकिनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रमाण अधिक असले तरी महिलाही मागे नाहीत. अनेक महिलांना हे व्यसन लागले आहे. विशेषत: घरकामे करणाऱ्या मोलकरीण व रोजमजुरी व गोट्यामातीचे काम करणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. 

Image may contain: 1 person, sitting
खर्रा घोटताना अंध रामेश्‍वर

अंध रामेश्‍वरला मिळाला आधार

रामेश्‍वर बोबाटे हा 29 वर्षीय युवक अंध आहे. रोजीरोटीचे दुसरे साधन नसल्यामुळे त्याने पाच वर्षांपूर्वी पानठेला सुरू केला. कुकर दुरुस्तीचा व्यवसाय करणारे मधुसूदन बनकर यांनी त्यांच्याच दुकानात रामेश्‍वरला आश्रय दिला. या ठिकाणी बारावी पास रामेश्‍वर रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत खर्रा घोटत असतो. दिवसभर मेहनत केल्यानंतर रामेश्‍वरला शंभर ते दीडशे रुपयांची कमाई होते. यातून तो मोलमजुरी करणाऱ्या आपल्या आईला आर्थिक हातभार लावतो. शिवाय त्याला संजय गांधी निराधार योजनेचे सहाशे रुपये मिळतात. अंध असूनही रामेश्‍वर दुसऱ्यापुढे हात न पसरविता स्वत: मेहनत करून कमाई करीत असल्याने खुश आहे. 

मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

Image may contain: 1 person
डॉ. कृष्णा कांबळे

तोंडाचा कर्करोग होण्याची शक्‍यता 
मुंबई-पुण्याच्या तुलनेत विदर्भात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. जागोजागी पानठेल्यावर खर्ऱ्याची विक्री होत असल्यामुळे अनेकांना हे व्यसन जडले आहे. विशेषत: युवापिढी खर्ऱ्याच्या आहारी गेली आहे. नियमित खर्रा चघळत राहिल्याने तोंडाचा कर्करोग होऊन जीव जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पान-सुपारीपासून विशेषत: खर्ऱ्यापासून दूर राहणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात शाळा-कॉलेजेसमध्ये जनजागृती करणे काळाची गरज आहे. 
- डॉ. कृष्णा कांबळे, कर्करोगतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young people started the panthela