तरुण अडकले विषारी दारूच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असल्याने लगतच्या दोन राज्यांतून मोठ्या प्रमाणात बनावट व विषारी दारूचा पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव जात आहे. त्यात युवक व्यसनाधीन होत असल्याने पालकांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा मुख्यालय, तालुका तसेच मोठ्या गावांमध्ये दारूतस्करांनी आपले जाळे विणले आहे. अल्पवयीन मुले तसेच
महिलांच्या मदतीने दारूविक्री केली जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असल्याने लगतच्या दोन राज्यांतून मोठ्या प्रमाणात बनावट व विषारी दारूचा पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव जात आहे. त्यात युवक व्यसनाधीन होत असल्याने पालकांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा मुख्यालय, तालुका तसेच मोठ्या गावांमध्ये दारूतस्करांनी आपले जाळे विणले आहे. अल्पवयीन मुले तसेच
महिलांच्या मदतीने दारूविक्री केली जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
कोरची तालुक्‍यातील एका महिला सरपंचानेही जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याची मागणी केली आहे. अनेक गावांत गावठी दारूत विषारी व बनावट दारूचे मिश्रण केले जाते. देशी-विदेशी दारूसोबतच मोहफूल तसेच गुळापासून तयार केलेल्या दारूचे भावही चारपट वाढल्याने त्याचाही आर्थिक फटका बसत असल्याने बंदीच हटवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आठवडाभरापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या लाइव्ह कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची मागणी केली होती. 5 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली येथील पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर एका वर्तमानपत्रातही आमदार होळींच्या मागणीसंदर्भात बातमी प्रकाशित झाली. या दोन्ही बातम्यांनंतर राजकीय वर्तुळात वादळ उठल्यानंतर आमदार होळी यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीबाबत समीक्षा करण्याची मागणी केली होती.
जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी करण्यात आली. परंतु, अलीकडच्या काळात जिल्ह्यात बनावट व विषारी दारूची विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जीव जात आहे. अनेक महिला विधवा झाल्या आहेत. याबाबत आपण आमदार होताच विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता, असे मत आमदार डॉ. होळी व्यक्त केले. दारूबंदीचा किती फायदा वा तोटा झाला, हे जनतेला कळणे आवश्‍यक आहे. दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात अवैध मार्गाने होत असलेल्या बनावट दारू व विषारी दारूविक्रीबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांकडून गंभीर प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याने दारूबंदी विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात
आहे.
मुक्तिपथला हवी ग्रामस्थांची साथ
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून मुक्तिपथच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी विविध कार्यक्रम, जनजागृती तसेच महिलांच्या सहकार्याने अनेक गावांत दारूबंदी करण्यात आली. परंतु, दारूतस्करांकडून नवनवीन शक्कल लढवून ग्रामीण भागात दारूविक्रीसाठी प्रयत्न केले जात आहेत. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिस पथकाकडून अनेकदा मोठ्या कारवाया करून आजवर कोट्यवधी रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. मात्र, स्थानिक पातळीवर दारूविक्रेत्यांना पाठबळ मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young stuck in poisonous liquor