व्हा सावध : स्वीत्झर्लंड दूतावासात नोकरीचे दाखवले आमिष; तरुणांची लाखोंनी फसवणूक

Youngsters cheated by offering job at Switzerland embassy
Youngsters cheated by offering job at Switzerland embassy

अमरावती : भारतातील स्वीत्झर्लंड दूतावासात रिक्त असलेल्या जागांवर पदभरती करण्याचे आमिष दाखवून एका चौकडीने काही सेवानिवृत्त तर, काही विद्यमान शिक्षकांच्या पाल्यांची तब्बल 19 लाख 28 हजार रुपयांनी फसवणूक केली. पाच जण या टोळीच्या आमिषाला बळी पडल्याची बाब उघडकीस आली.

सूरजमल आंबेडकर (रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश), डेव्हिड राज (पुणे), अमित डवरे (रहाटगाव, अमरावती) व प्रफुल्ल कडू या चौघांविरुद्ध विश्वासघात, फसवणूक प्रकरणी अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाबाराव पांडुरंग हेरोळे (वय 55, रा. खानझोडे रेसिडेन्सी, अचलपूर) यांनी त्यासंदर्भात लेखी तक्रार दिली. खानझोडे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्त घेतली. त्यामुळे त्यांच्याजवळ पैसेही जमले होते. त्यांच्या मुलाला व मुलीला कथित दूतावासात नोकरी लावून देण्यासाठी संबंधित चौकडीसोबत त्यांनी चर्चा केली होती.

त्यानंतर सूरजमल आंबेडकर याने त्याचा दिल्ली येथील बॅंकखाते क्रमांक देऊन त्यात पैसे जमा करण्यास सांगितले. भारतातील स्वीत्झर्लंड दूतावासात सिनिअर सेक्‍शन ऑफिसर, सेक्‍शन ऑफिसरसह लिपिक पदाच्या रिक्त जागांपैकी 20 टक्के कोटा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या माध्यमातून भरला जातो, अशी बतावणी या चौकडीने केली होती. त्यामुळे अन्य काही पालकसुद्धा आपल्या पाल्यांच्या नोकरीसाठी पैसे देण्यासाठी तयार झाले. पाच जणांपैकी कुणी साडेतीन, कुणी सव्वातीन लाख तर, काहींनी चार ते साडेचार लाखांपर्यंतची रक्कम सूरजमलच्या दिल्ली येथील खात्यात ऑनलाइन जमा केली.

या चौकडीने सेवानिवृत्त शिक्षक श्री. हेरोळे यांना नोव्हेंबरमध्ये गाठले होते. त्यांच्यासह इतर काही लोकांकडून जानेवारीच्या शेवटपर्यंत या चौकडीने पैसे उकळले. परंतु, त्यानंतर चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन उचलणे बंद केले. त्यामुळे संबंधितांनी आपली फसवणूक केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर बाबाराव हेरोळे यांनी अचलपूर ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर विश्वासघात, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसल्याने नोकरीच्या आशेवर असलेल्या बेरोजगारांना गंडविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नोकरीच्या आमिषाने मागितलेली रक्‍कम खात्यात ऑनलाईन वळती केली की, नंतर संबंधित मोबाईल बंद होतो. तरुणांनी सावध राहूनच कोणतेही पाऊल उचलावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चौकशीअंती होईल खुलासा

सूरजमल टोळीचा प्रमुख असून, डेव्हिड त्याचाच साथीदार आहे. त्यांनी ठवरे व कडूच्या माध्यमातून काही लोकांना हेरले. पहिल्या टप्प्यात पाच जणांनी तक्रार केली. चौकशीअंती बऱ्याच बाबी पुढे येतील.
सेवानंद वानखडे, पोलिस निरीक्षक, अचलपूर ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com